नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराने पिंपरी-चिंचवडमधील बलाढय़ राष्ट्रवादी काँग्रेसची आणि रायगड जिल्ह्य़ात शेकापची एकाच वेळी धूळधाण उडवली. त्यामुळे या भागातील समीकरणे बदललीच, पुढच्या काळातही अनेक बदल झाले आहेत. चिंचवड मतदारसंघातील आमदार लक्ष्मण जगताप यांनी कोणत्या पक्षाकडून लढणार हे अजून स्पष्ट केलेले नाही, तर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेस सोडून भाजपचा रस्ता धरला आहे. पिंपरी-चिंचवडमधील आमदार टिकविण्यासाठी अजित पवार ताकदीने उतरले आहेत आणि रायगड जिल्ह्य़ात शेकापने अस्तित्व राखण्यासाठी संपूर्ण ताकद लावली आहे. हा मतदारसंघ निम्मा पश्चिम महाराष्ट्रात, तर निम्मा कोकणात विभागला गेला आहे. मावळ विधानसभेसाठी अजितदादांनी वैयक्तिक लक्ष घातले असून गोळीबाराच्या घटनेनंतर मावळजिंकण्याचा विषय त्यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. चिंचवडमध्ये पक्षापेक्षा व्यक्ती महत्त्वाची राहणार आहे. रायगड जिल्ह्य़ात शेकापची शिवसेनेबरोबरची आघाडी या वेळी नसेल, त्यामुळे त्यांची अस्तित्व टिकविण्याची लढाई आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही जागांच्या वाटपावरून वाद आहेत. प्रशांत ठाकूर भाजपच्या वाटेवर आहेत, पण तिथे या पक्षाला फारसे स्थान नाही. या सर्व गुंतागुतींच्या पाश्र्वभूमीवर निवडणुकीत चुरस  हे निश्चित!
पिंपरी
राखीव मतदारसंघ असलेल्या िपपरीतून पक्षांतर्गत पातळीवर तीव्र विरोध असतानाही राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे निवडून आले. भाजपचे अमर साबळे यांनी बनसोंडेना तुल्यबळ लढत दिली होती. बनसोडेंना पुन्हा आमदारकी हवी असली तरी त्यांच्या विरोधकांची संख्या वाढली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे राष्ट्रवादीतच नाराजी आहे. काँग्रेसने माजी उपमहापौर गौतम चाबुकस्वार यांची संभाव्य उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून िपपरी मतदारसंघाची मागणी लावून धरली आहे. भाजप व राष्ट्रवादी, अशा दोन्हीकडून पाडापाडीचे राजकारण होणार असल्याचे संकेत आहेत.
चिंचवड
विधानपरिषद व विधानसभा निवडणुकांमध्ये सलग अपक्ष निवडून आलेले लक्ष्मण जगताप आमदारकीच्या हॅट्रीकसाठी प्रयत्नशील असून यंदा अपक्ष न लढता ते राष्ट्रवादीच्या उमेदवारीची चाचपणी करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी महत्वाचे प्रश्न रखडवून ठेवल्याच्या निषेधार्थ लोकसभा निवडणुकीत जगतापांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली व मावळ लोकसभेसाठी शेकापची उमेदवारी स्वीकारली. तथापि, मोदी लाट आणि राज ठाकरेंच्या बांधकामे पाडण्याच्या ‘त्या’ विधानामुळे जगताप मोठय़ा फरकाने  पराभूत झाले. चिंचवडसाठी जगताप समर्थकांची मोर्चेबांधणी दिसत असली तरी जगतापांचा अंतिम निर्णय झालेला नाही. चिंचवड काँग्रेसकडे आहे. तथापि, राष्ट्रवादीच चिंचवड लढवणार असल्याचे अजितदादांनी स्पष्ट केल्याने दोन्ही काँग्रेसमध्ये धुसफूस  आहे. शिवसेनेकडे इच्छुकांची संख्याही जास्त आहे.
मावळ
मावळ विधानसभा म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. रूपलेखा ढोरे, दिगंबर भेगडे यांच्यानंतर भाजपच्या बाळा भेगडे यांनी राष्ट्रवादी बापू भेगडे यांचा पराभव करून  मावळची जागा कायम राखली. बाळा भेगडे पुन्हा लढण्यास उत्सुक आहेत. तथापि, पक्षांतर्गत पातळीवर त्यांना वाढता विरोधही आहे. मावळातील राष्ट्रवादीच्या ताकतीच्या सुभेदारांमध्ये असलेले ‘शीतयुध्द’ हेच पराभवाचे कारण असल्याचे उघड गुपित आहे. मोठय़ा प्रमाणात इच्छुक आणि गटातटाची तशीच परिस्थिती याही वेळी दिसू लागल्याने अजितदादांनी पुण्यात सर्व इच्छुकांची बैठक घेत त्यांच्यात मनोमीलन करण्याचा प्रयत्न केला.
पनवेल
शेकापचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची आजवर ओळख आहे. १९५२ पासून सातत्याने या मतदारसंघात शेकापचा उमेदवार निवडून येत आहे. सुरुवातीला दत्तूशेठ पाटील, त्यानंतर दि. बा. पाटील आणि त्यानंतर विवेक पाटील यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.मात्र २००९ च्या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांनी शेकापची मक्तेदारी मोडीत काढत पनवेलवर काँग्रेसचा झेंडा फडकावत इतिहास घडवला. वाढत्या नागरीकरणामुळे बहुभाषिक आणि परप्रांतीय मतदारांची संख्या वाढल्याने ठाकूर यांना हे यश मिळाले असले तरी पनवेलच्या ग्रामीण भागावर शेकापची पकड अजूनही घट्ट आहे. खारघर टोल मुद्दय़ावरून राजीनामा देत आ. प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. त्यामुळे मतदारसंघात ऐन निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. शेकापकडून बाळाराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
उरण  
 या मतदारसंघावर शेकाप आणि शिवसेनेची पकड आहे. मात्र, शेकाप-सेना युती संपुष्टात आल्याने दोघांची ताकद विभागली जाणार आहे. त्यामुळे याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. गेल्या वेळी शेकापचे विवेक पाटील येथून निवडून गेले. या वेळीही शेकापचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर झाले आहे.
कर्जत
कधी काँग्रेस- राष्ट्रवादी तर कधी शिवसेनेचा उमेदवार या मतदारसंघातून निवडून आला आहे. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघातून मागील वेळी शिवसेनेत मोठय़ा प्रमाणावर झालेली बंडखोरी आणि मनसेचा उमेदवार यामुळे राष्ट्रवादीचे सुरेश लाड विजयी झाले. लाड यांनी आपल्या मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर विकासकामे केली आहेत. मात्र तरीही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना मोठे मताधिक्य मिळाले. त्यामुळे शिवसेनेच्या आशा उंचावल्या आहेत. प्रमुख लढत सेना-राष्ट्रवादीत अपेक्षित आहे.