रायगड लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढती होणार असून, शेतकरी कामगार पक्ष अस्तित्व राखण्यासाठी निवडणुकीत उतरणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शेकाप- शिवसेना युती संपुष्टात आल्याने मतविभाजनाचा थेट फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला होईल असा कयास आहे. रायगड लोकसभेच्या चुरशीच्या लढतीत शिवसेनेच्या अनंत गीते यांनी बाजी मारत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांचा पराभव केला होता; तरीही विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश संपादन करण्यासाठी सेनेला तारेवरची करावी लागणार  आहे.  मतदारसंघात शेकापचे २, राष्ट्रवादीचे २ आणि शिवसेनेचे २ आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत शेकाप आणि शिवसेना अशी युती होती. याचा फायदा शेकाप आणि सेनेला झाला होता. मात्र, युती संपुष्टात आल्याने दोन्ही पक्षांच्या मतांचे मोठय़ा प्रमाणात विभाजन होणार आहे.
दुसरीकडे आघाडीतील जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही. मतदारसंघात ताकद वाढल्याने जादा जागांसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघाचा अपवाद सोडला तर रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपचे अस्तित्वच नाही.
अलिबाग
शेकापचा बालेकिल्ला म्हणून मतदार संघाची ओळख आहे. १९९९ मध्ये येथून मीनाक्षी पाटील आमदार झाल्या. त्यानंतर २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मीनाक्षी पाटील यांचा पराभव करीत काँग्रेसचे मधुकर ठाकूर निवडून आले. २००९ मध्ये मीनाक्षी पाटील पुन्हा आमदार झाल्या. या वेळी मीनाक्षी पाटील निवडणुकीच्या िरगणात नाहीत. त्यांचे बंधू, पंडित पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यावेळी शेकापसमोर काँग्रेसबरोबर शिवसेनेचे आव्हान आहे.
पेण
काँग्रेसचे रवींद्र पाटील २००४ मध्ये येथून निवडून गेले आणि मंत्री झाले. मात्र, २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनिल तटकरे यांच्या बंडखोरीमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला.  शेकापचे धर्यशील पाटील आमदार झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेकापची मते शिवसेनेकडे वळल्याने या मतदारसंघात निसटते मताधिक्य मिळाले होते. शेकापने धर्यशील पाटलांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून रवींद्र पाटील इच्छुक असल्याने मतदारसंघात तिरंगी लढत अपेक्षित आहे.
श्रीवर्धन
श्रीवर्धन हा पूर्वी काँग्रेसचा आणि त्यांनतर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. शिवसेनेचे शाम सावंत सलग तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले. गेल्या निवडणुकीत सुनील तटकरे यांनी शिवसेनेची मक्तेदारी मोडीत काढली आहे. तटकरे यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत या मतदारसंघात कोटय़वधीची विकासकामे आणून आपली पकड आणखी घट्ट केली. या मतदारसंघात प्रमुख लढत राष्ट्रवादी आणि शिवसेना अशीच अपेक्षित आहे.  तटकरेंऐवजी कोण उमेदवार देणार याकडे लक्ष आहे.
महाड
महाड मतदारसंघावर शिवसेनेचे प्राबल्य आहे. १९९० पासून २००४ चा अपवाद वगळला तर सातत्याने येथून शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. १९९० ते ९९ असे तीन वेळा सेनेचे प्रभाकर मोरे येथून निवडून आले, तर २००४ मध्ये राष्ट्रवादीचे माणिक जगताप यांनी मोरे यांचा पराभव केला. २००९ मध्ये पुन्हा सेनेचे भरत गोगावले यांनी माणिक जगताप यांचा पराभव केला. या निवडणुकीनंतर सुनील तटकरे यांच्याशी झालेल्या मतभेदांमळे माणिक जगताप राष्ट्रवादीतून बाहेर पडले व काँग्रेसमध्ये दाखल झाले. या जागेबाबत औत्सुक्य आहे.
गुहागर
भाजपचा परंपरागत मतदारसंघ म्हणून गुहागरची ओळख आहे. मात्र गेल्या विनय नातू यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेच्या रामदास कदम यांचा पराभव झाला होता आणि राष्ट्रवादीचे भास्कर जाधव विजयी झाले होते. मंत्रिपदाचा फायदा करून भास्कर जाधव यांनी या मतदारसंघाची बांधणी केली. कोटय़वधी रुपयांचा निधी या पाच वर्षांत खर्च करण्यात आला.  हा मतदारसंघ यावेळी भाजपच्या वाटय़ाला जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना मताधिक्य मिळाले होते.
दापोली
शिवसेनेचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची ओळख आहे. शिवसेनेचे सूर्यकांत दळवी सलग पाच वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. पाचही वेळेला काँग्रेसच्या उमेदवाराने दळवी यांच्यासमोर टिकावदेखील धरला नव्हता. त्यावरून या मतदारसंघातील सेनेची ताकद लक्षात येते. शिवसेनेला एकगठ्ठा मतदान होण्याची या मतदारसंघाची परंपरा आहे. दुसरीकडे आघाडीच्या उमेदवाराची निश्चिती अद्याप झालेली नाही. दळवी यांचे आव्हान पेलणारा उमेदवार काँग्रेसला सापडलेला दिसत नाही.