देशभर मोदी लाट असताना आघाडीची पाठराखण करणाऱ्या सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते यंदा आघाडीतील फुटीमुळे बदलली आहेत. यातही काँग्रेसपुढची आव्हाने आणखी अवघड झाली आहेत. यातूनच ‘कराड दक्षिण’मध्ये काँग्रेस नेतृत्वाची यंदा कसोटी आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून पक्षाला मोठी आशा आहे. पण कराड दक्षिण आणि पाटणमधील विरोधकांचे आव्हान, माण-खटावमधील बंडाने समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
कराड दक्षिण
थोर विचारवंत यशवंतराव मोहिते तसेच विलासराव पाटील-उंडाळकर या उभयतांनी प्रदीर्घ काळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांना प्रतिष्ठेची मंत्रिपदेही मिळाली. यंदा यातील उंडाळकर पुन्हा रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण प्रथमच विधानसभेसाठी नशीब आजमावत आहेत. विलासराव देशमुखांचे जावई डॉ. अतुल भोसले यांनी पाच वर्षांत तीन पक्षात प्रवेश करीत सध्या भाजपमधून उमेदवारी आयात केली आहे. तीन मातबर उमेदवार असल्याने सर्व राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. चव्हाणांची स्वच्छ प्रतिमा, पक्षनिष्ठा, उंडाळकरांचा जनाधार आणि डॉ. भोसलेंचा विकासाचा चेहरा पणाला लागला आहे.
कराड उत्तर
पुनर्रचनेत ४ तालुक्यांत विभागलेला कराड उत्तर मतदारसंघ राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासाठी तुलनेत लढत सोपी वाटत आहे. त्यांच्या सह्य़ाद्री साखर कारखाना कार्यक्षेत्रात बहुतांश मतदारसंघ येतो.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोज घोरपडे रान उठवून आहेत. काँग्रेसचे धर्यशील कदम यांनी सत्तेच्या माध्यमातून १५० कोटी दिल्याच्या मुद्दय़ावर भर दिला आहे. आघाडी तुटल्याने काँग्रेसच्या उमेदवाराचा सामना करावा लागत असला, तरी विरोधी मतांची विभागणी बाळासाहेबांच्या पथ्यावर पडणारी आहे.
पाटण
देसाई, पाटणकर घराण्यांतील पारंपरिक लढत असलेला हा मतदारसंघ. यंदाही या दोन घराण्यांमध्येच लढत आहे. शिवसेनेकडून शंभूराज देसाई तर राष्ट्रवादीकडून आमदार विक्रमसिंह पाटणकरांचे पुत्र सत्यजितसिंह मैदानात आहेत. काही दिवसांपूर्वी तुल्यबळ असलेल्या या लढतीत आघाडीच्या फुटीमुळे देसाईंना काहीसा दिलासा मिळाला आहे. काँग्रेसतर्फे हिंदुराव पाटील हे रिंगणात आहेत. भाजप, मनसेच्या उमेदवारांची ताकद अगदीच मर्यादित राहणार आहे.
सातारा
सातारा विधानसभा मतदारसंघाचा इतिहास आजवर राजवाडय़ांच्या अवतीभवती फिरत राहिला आहे. गेली ४० वष्रे भोसले घराण्याची सत्ता येथे आहे. माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले यांचे पुत्र शिवेंद्रसिंहराजे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. खासदार उदयनराजे व शिवेंद्रराजे एकत्र असल्याने या भावांची हुकमत आहे. सध्या भाजपतर्फे िरगणात असलेले दीपक पवार पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. शिवसेनेने दगडू सपकाळ यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने रजनी पवार यांच्या रूपाने एकमेव महिला उमेदवार दिला आहे.  
कोरेगाव
पालकमंत्री शशिकांत िशदे यांनी जावलीहून कोरेगावात येत गेल्या निवडणुकीत ज्येष्ठ नेत्या डॉ. शालिनीताई पाटील यांना पराभूत केले होते. काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नव्याने िरगणात आलेले संजय भगत, शिवसेनेचे हणमंत चौरे, काँग्रेसचे अ‍ॅड. विजयराव कणसे यांच्यात ही लढत होणार आहे. भाजपने हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिला आहे. मात्र, खरी लढत शशिकांत शिंदे व अ‍ॅड. विजयराव कणसे यांच्यातच आहे.
वाई
वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तीन तालुक्यांचा मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पर्यायात हा मतदारसंघ कायम असतो. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर मकरंद पाटील यांनी काँग्रेसच्या मदन भोसलेचा पराभव केला होता. आता पुन्हा याच लढतीचा दुसरा अंक होत आहे. फरक फक्त मकरंद पाटील या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून लढत आहेत. या लढतीत या दोघांच्याही नेतृत्व आणि अस्तित्वाचा कस लागणार आहे. शिवसेनेने महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांना तर भाजपने पुरुषोत्तम जाधव यांना उमेदवारी दिली आहे. हे दोन उमेदवार किती आणि कुणाची मते घेतात यावरही निकालाचा कल अवलंबून राहणार आहे.
लक्षवेधी लढती
नारायण राणे-काँग्रेस
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील कुडाळ मतदारसंघात पुन्हा एकदा गेल्या वेळचे प्रतिस्पर्धी आमने-सामने आहेत. उद्योगमंत्री नारायण राणे यांना शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी आव्हान दिले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरलेल्या पुष्पसेन सावंत यांच्यामुळे ही लढत तिरंगी झाली आहे.
बलस्थान
काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते, व मंत्रिमंडळात प्रमुख खाती सांभाळली.
राणे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी
मराठा आरक्षणाचा फायदा मिळण्याची चिन्हे
कच्चे दुवे
मंत्रिपदाचा जिल्ह्य़ाला काय फायदा असा विरोधकांचा प्रचार अडचणीचा ठरू शकतो.
अनेक जुने सहकारी साथ सोडून गेले मतदारसंघातील प्रकल्पांना लोकांचा विरोध
वैभव नाईक
बलस्थान
गेल्या वेळी निवडणूक लढवल्याने तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद असल्याने प्रमुख राणेविरोधक म्हणून चर्चेत. सतत कार्यकर्त्यांशी संपर्क
लोकसभेला शिवसेनेच्या विजयाने आत्मविश्वास वाढला
कच्चे दुवे
राणेंच्या विरोधात एकास-एक उमेदवार देण्यात अपयश
बहुसंख्य सत्तास्थाने काँग्रेसकडे
केवळ राणेविरोध अडचणीचा
आर.आर. पाटील (राष्ट्रवादी)
सांगली जिल्ह्य़ातील तासगाव मतदारसंघात या वेळी गृहमंत्री आर.आर. पाटील यांना एके काळचे त्यांचे सहकारी अजित घोरपडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन आव्हान दिले आहे. त्यामुळे आबांसाठी ही लढत सोपी नाही. घोरपडे यांच्या पाठीशी खासदार संजय पाटील यांची ताकद आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने सांगलीतून विजय मिळवल्याने भाजपच्या अपेक्षा वाढल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसने हा मतदारसंघ गमावला.
बलस्थान
स्वच्छ प्रतिमा, अनेक वर्षे महत्त्वाच्या पदांवर
उत्तम वक्तृत्व, त्याच्या जोरावर मैदान मारण्याची हातोटी
तळागाळातून वर आलेला सामान्य कार्यकर्ता
कच्चे दुवे
भावाकडून राजकारणात होणारा हस्तक्षेप
मंत्रिपदामुळे सामान्यांशी तुटलेला संपर्क
लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश ही धोक्याची घंटा
वि. अजित घोरपडे (भाजप)
बलस्थान
उत्तम कार्यकर्ता अशी प्रतिमा.
खासदार संजय पाटील यांचे राजकारण घडवण्यास कारणीभूत
सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील लाटेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न
कच्चे दुवे
वारंवार कार्यकर्त्यांना विश्वास न घेता पक्ष बदलल्याचा आरोप होत असल्याने अडचण
संस्थानिकी राहणीमानामुळे सामान्य कार्यकर्त्यांशी फारसा संपर्क नसल्याचा ठपका
भाजपवर जातीयवादाचा शिक्का अडचणीचा ठरण्याची चिन्हे