रायगड जिल्ह्यात विधानसभेच्या सात मतदारसंघासाठीची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. जिल्ह्यातील ८८ उमेदवारांचे भवितव्य आज मतदानयंत्रात बंद झाले. जिल्ह्यात सरासरी ६९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. महाड विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
रायगड जिल्ह्यात अलिबाग, पनवेल, पेण, कर्जत, उरण, महाड आणि श्रीवर्धन या सात विधानसभा मतदारसंघांतील २ हजार ४८८ मतदान केंद्रांमध्ये सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातील मतदानाचा वेग फार मंद होता. पहिल्या दोन तासांत अवघे ८.१४ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मात्र मतदानाचा वेग वाढला. दुपारी १ वाजेपर्यंत २९.१३ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४६ टक्के मतदानाची नोंद झाली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५६.८२ टक्के मतदानाची नोंद झाली.
अलिबाग विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार मधुकर ठाकूर यांनी सातिर्जे येथील मतदान केंद्रावर मतदान केले. तर शेकापचे उमेदवार सुभाष पाटील यांनी पेझारी येथे, शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी व भाजप उमेदवार प्रकाश काठे यांनी थळ येथे मतदान केले. शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आमदार मीनाक्षी पाटील यांनी पेझारी येथे मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या कुटुंबीयांसह दुरटोली येथील मतदान केंद्रावर मतदान केले. अवधूत तटकरे यांनी रोहा येथे मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी अलिबाग येथील रामनाथमधील मतदान केंद्रावर मतदान केले.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १२ हजार १०५ अधिकारी आणि कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी झाले. अडीच हजार पोलीस कर्मचारी आणि निमलष्करी दलाच्या सहा कंपन्या या वेळी तनात करण्यात आल्या होत्या. सुरक्षिततेचा उपाय म्हणून १३७ समाजकंटकांना तडीपार करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यात निवडणुक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली. काही ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडण्याचे किरकोळ प्रकार घडले. त्या ठिकाणी मतदान यंत्रे बदलून त्वरित मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी सुमंत भांगे दिवसभर मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. महाड येथे निवडणूक कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. योगेश भिसे (वय ३०) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो पोलादपूर तहसील कार्यालयात  कार्यरत होता.