महाराष्ट्रात शिवशाही व सुराज्य आणण्याचा निर्धार आता भाजपनेही केला असून देशाप्रमाणेच महाराष्ट्रही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त करण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. ‘छत्रपतींचा आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ’ असा नारा देत राज्यात भाजपसह युतीची सत्ता आणली जाईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. त्यामुळे त्यांनी राज्यात शिवसेना-भाजप युती राहील, असे संकेत दिले आहेत.
अध्यक्ष झाल्यानंतर मुंबई भेटीवर प्रथमच आलेल्या शहा यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपने षण्मुखानंद सभागृहात ‘विजयी संकल्प मेळावा’ आयोजित केला होता. शिवशाही व सुराज्य आणण्याची संकल्पना शिवसेनेकडून नेहमीच मांडली जाते. पण भाजपचे अध्यक्ष शहा यांनीही आपल्या भाषणात छत्रपती शिवरायांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्य स्थापन केले नाही, तर सुराज्य आणले. तोच संकल्प पुन्हा घेऊन राज्यात १५ वर्षे असलेली भ्रष्टाचारी राजवट उलथून टाकण्यात यावी. या सरकारने तब्बल ११ लाख ८८ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार आपल्या राजवटीत केला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची ही यादी भागवत सप्ताहापेक्षाही लांबेल, अशी टीका त्यांनी केली.
महाराष्ट्राच्या विकासाची गेल्या काही वर्षांत वाट लागली आहे. याउलट महाराष्ट्राच्या आसपासच्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता असून तेथे २४ तास अखंडित वीज, उद्योगधंद्यांचा विकास, कृषीउत्पन्न वाढीचा चांगला दर असे चित्र आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राचा विकास करण्याऐवजी नेत्यांनी आपले खिसे भरले, अशी टीका शहा यांनी केली. युती राहील किंवा नाही आणि जागावाटप कसे होईल, याची चिंता न करता कामाला लागावे आणि नरेंद्र मोदी सरकार करीत असलेली कामगिरी घरोघरी पोचवावी, असे आवाहन शहा यांनी केले. तत्पूर्वी, गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी किती फायलींवर सह्या केल्या व त्याचा फायदा कोणाला झाला, असा सवाल प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला.
शिवसेनाप्रमुखांचा आवर्जून उल्लेख
शहा यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीसच महाराष्ट्र ही शिवराय, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, संत रामदास तुकाराम यांच्याबरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही भूमी असल्याचा उल्लेख केला.
भाजपमध्ये नेत्यांचे प्रवेश
शहा यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नातेवाईक माजी खासदार भास्करराव खतगावकर, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, बबनराव पाचपुते, माधव किन्हाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्याबरोबर अनेक स्थानिक नेते, जिल्हा परिषद, साखर कारखान्याचे पदाधिकारी भाजपमध्ये आले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात बरीच गर्दी केली होती.
अखेर शरद पवार यांच्यावर टीकास्त्र !
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचे केलेले समर्थन, संसदेत भाजपने मांडलेल्या विधेयकांना राष्ट्रवादीने दिलेला पाठिंबा यामुळे राज्यात निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे गुळपीट जमणार का, अशी चर्चा सुरू झाली असतानाच शेतकऱ्यांच्या मुद्दय़ावर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका करून निर्माण झालेले मळभ दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजप आणि शिवसेनेचे ताणलेले संबंध व राष्ट्रवादीची भाजपशी वाढलेली जवळीक यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण होते. लोकसभा प्रचाराच्या काळात पवार यांनी मोदी यांचे समर्थन केले होते तर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राष्ट्रवादीवर टीका करण्याचे टाळले होते. पण कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अमित शहा यांनी थेट पवार यांच्यावर हल्ला चढविला. यूपीए सरकारच्या काळात जागतिक व्यापार संघटनेत शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करण्यात आले तेव्हा शरद पवार कोणत्या उद्योगपतीबरोबर चर्चा करीत होते, असा सवाल शहा यांनी केला. शहा यांनी पवार यांचे नाव घेऊन त्यांच्यावर टीका करीत भाजप राष्ट्रवादीबद्दल सौम्य नाही हा संदेश दिला आहे.