भारिप-बहुजन महासंघ, शेकाप, माकप व काही अपक्ष आमदारांनी एकत्र येऊन स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घेतला आहे. हा गट सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देईल किंवा कसे याबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
त्रिशंकू अवस्थेत अपक्ष व छोटय़ा पक्षांच्या आमदारांना विशेष महत्व प्राप्त होते. त्यादृष्टीने भाजप व शिवसेनेनेही काही अपक्ष आमदारांना संपर्क साधून आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नव्या विधानसभेत शेकाप-३, भारिप-१, माकप-१, समाजवादी पक्ष-१, बहुजन विकास आघाडी-३, एमआयएम-२ व अपक्ष ७ मिळून १८ आमदार आहेत. शेकाप, भारिप व माकप यांनी एकत्रितपणे आघाडी करून निवडणुका लढविल्या होत्या. आताच्या परिस्थितीत लहान पक्षांना व अपक्ष आमदारांना एकत्र करण्याचा आंबेडकर यांचा प्रयत्न आहे.
त्यानुसार सोमवारी अपक्ष आमदारांची बैठक झाली. त्यात स्वंतत्र गट स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. सध्या डाव्या लोकशाही आघाडीचे पाच व अपक्ष सहा असे अकरा आमदार एकत्र असल्याची माहिती त्यांनी दिली. अबू आझमीही या आघाडीत येतील, असे ते म्हणाले. सभागृहात अपक्षांचा स्वतंत्र गट म्हणून बसेल, असे प्रकाश आंबेडकर व शेकापचे नेते प्रा. एस.व्ही. जाधव यांनी सांगितले.