नगर जिल्हय़ातील दिग्गज नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे (दोघेही काँग्रेस) यांच्यासह बबनराव पाचपुते, माजी मंत्री मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड (राष्ट्रवादी) आदी १३८ उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतपेटीत बंद झाले. प्राथमिक अंदाजानुसार जिल्हय़ात उत्साहात आणि शांततेत ६५ ते ७० टक्के मतदान झाले आहे.
नगर शहरात सुमारे ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक निर्णय अधिकारी वामन कदम यांनी व्यक्त केला. शहराच्या काही भागांत विशेषत: मध्यवस्तीत व केडगावमध्ये सायंकाळी मतदारांनी गर्दी केल्याने सहानंतरही मतदानाची प्रक्रिया सुरू होती. केडगावमधील एका केंद्रावर सायंकाळी ६.४५ पर्यंत मतदान सुरू होते.
जिल्हय़ात माजी आदिवासी विकासमंत्री व ऐनवेळी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये पक्षांतर करणारे बबनराव पाचपुते (श्रीगोंदे), माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या पक्षांतर करणाऱ्या स्नुषा स्नेहलता कोल्हे (कोपरगाव), माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड (अकोले), राष्ट्रवादीचा त्याग करून भाजपमध्ये गेलेल्या जि.प.च्या माजी उपाध्यक्ष मोनिका राजळे (पाथर्डी-शेवगाव) यांच्या लढती लक्षणीय होत्या.