शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेवर बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी टीका केली आहे. शिक्षण क्षेत्राबाबत कोणीही राजकारण करू नये आणि कोणी तसे करत असल्यास ते सर्वस्वी अयोग्य आहे, असे मांझी यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे हाच एकमेव उद्देश असला पाहिजे, बिहारमध्ये शिक्षण क्षेत्राचे राजकारण झालेले नाही. बिहारमधील विद्यार्थ्यांना प्रथम मोदी यांचे भाषण ऐकता येऊ शकणार नव्हते, मात्र त्यानंतर त्यामध्ये बदल झाला. पायाभूत सुविधांच्या अभावांमुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोदी यांचे भाषण ऐकता येणार नाही, असेही मांझी म्हणाले.
मोदी दरवर्षी विद्यार्थ्यांना संबोधित करणार असतील तर सरकारी शाळांमध्ये व्यवस्था शक्य होईल, असेही मांझी म्हणाले.