भाजपच्या नेतृत्वाला अफझलखानाची उपमा देऊन यांच्या फौजांना नेस्तनाबूत केले जाईल, अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याने भाजपमध्ये संतापाची लाट पसरली असून सेना-भाजपमदील संघर्ष आता तीव्र झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांच्यावर शिवसेनेकडून तोफा डागल्या जात असल्या तरी सेनेला थेट प्रत्युत्तर न देता संयमी प्रहार करण्याचे भाडपने ठरविले आहे.
शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील दुराव्यातून तेढ वाढतच गेली. आता निवडणुकीच्या रणधुमाळीत त्याचे रुपांतर संघर्षांतच झाले आहे. महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमुक्त करण्याचे दोन्ही पक्षांचे ध्येय असताना प्रत्यक्षात शिवसेनेकडून भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले जात आहे. ठाकरे हे थेट मोदी व अमित शहा यांनाच लक्ष्य करीत असून भाजपच्या नेत्यांना उद्देशून ‘अफझलखानाची फौज आली आहे’, अशी तुलना तुळजापूर येथील भाषणात केली. त्यामुळे भाजप नेते खवळले असून तुम्ही अफझलखानाच्या मंत्रिमंडळात आहात का, असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही विचारला. तर फडणवीस यांनी शिवजयंतीला हप्तेवसुली केली जाते व शिवरायांचे नाव घेऊन खंडणीखोरी होते, असे टीकास्त्र मुंबईतील सभेत सोडले.
त्यामुळे शिवसेनाही खवळली असून ‘सामना’ मुखपत्राच्या अग्रलेखातूनही  मोदी व भाजपचा समाचार घेतला जात आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप-शिवसेनेतच अधिक चिखलफेक होत असून या संघर्षांची धार वाढतच चालली आहे. शिवसेनेवर टीका करायची नाही, अशी भूमिका भाजपने घेतली असली, तरी ती फार काळ ठेवणे कठीण झाले असून चोख प्रत्युत्तर दिले नाही, तर भाजपचे लेचापेचा असल्याचा समज होऊ शकतो. त्यामुळे आता भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना-भाजपमधील तेढ वाढल्याने एका पक्षाला संपूर्ण बहुमत न मिळाल्यास निवडणूक निकालानंतर भाजपबरोबर सरकार स्थापन करण्यापेक्षा मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याचा पर्याय शिवसेना स्वीकारण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी राज व उद्धव ठाकरे यांचे मनोमीलन करण्याचे प्रयत्नही सुरु झाले आहेत.