‘इथे निवडणूक प्रचारार्थ लागणारे कार्यकर्ते रोजंदारीने मिळतील’ हा विनोद नव्हे, तर वस्तुस्थिती आहे. राजकीय पक्षांना आज कार्यकर्त्यांची वानवा असल्याने कामगार ठेकेदार ही दुकानदारी थाटून बसले आहेत. भाजपाच्या एका महिला नगरसेविकेच्या मुलाने तर ‘इथे निवडणूक प्रचारार्थ कार्यकर्ते रोजंदारीने मिळतील’ असा फलक लावून सरळ सरळ दुकानदारीच थाटली आहे.
या जिल्ह्य़ात कामगारांची चार ते साडेचार लाखावर संख्या आहे. लहान-मोठय़ा सर्वच पक्षांकडे कार्यकर्त्यांची वानवा आहे. आज सर्वच पक्ष या रोजंदारीने कार्यकर्त्यांची मदत घेत असल्याचे चित्र आहे. ५०० रुपयांपासून तर ४००, ३०० व २०० रुपये प्रती दिवसप्रमाणे या कार्यकर्त्यांचा मागणी तसा पुरवठा सुरू आहे. सभा, मेळावा, संमेलन किंवा रॅलीसाठी या कंत्राटदारांना एक-दोन दिवसापूर्वीच सांगावे लागते. जास्तीत जास्त दीड ते दोन हजार व कमीतकमी १०० कार्यकर्ते पुरविले जातात. एखाद्याला महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या टिपटॉप टिमसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. यात उमेदवारांनाही काहीही गैर वाटत नाही, परंतु यामुळे १५ दिवसांपासून बांधकाम व्यवसाय व शेतीची कामे आणि बहुतांश घरातील धुणीभांडीही पडून आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्याही सरसावल्या आहेत. सोशल मिडियासाठी सुशिक्षित बेरोजगारांना कंत्राट देऊन ‘वॉररूम’ सुरू केल्या आहेत. येथील एका उमेदवाराने तर मतदानाच्या दिवशी बुथवर बसण्यासाठी ३५० लॅपटॉपसह ५०० कार्यकर्त्यांची व्यवस्था केलेली आहे. यासंदर्भात एका कंत्राटी कार्यकर्त्यांला विचारल्यावर तो म्हणाला, आज पैसे मोजले तर सलमान, शाहरूख व अमिर खानपासून तर माधुरी, दीपिका, प्रियंका चोपडा, हेमामालिनीपासून सर्व येतात, तर मग आम्ही पैसे घेऊन प्रचार केला तर त्यात वाईट काय? आज नेता, पक्ष किंवा पक्षाची विचारसरणी याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. एखाद्या उमेदवाराचा आम्ही प्रचार करतो म्हणून त्यालाच मत देऊ, असेही नाही. आम्ही मत योग्य उमेदवारालाच देऊ, असे तो म्हणाला.
गडचिरोलीत काँग्रेस कार्यालयात गोंधळ
दिवसभर प्रचार केल्यानंतरही रोजंदारीचे पैसे दिले नाही म्हणून सुमारे तीन हजार महिलांनी शनिवारी सायंकाळी कॉंग्रेस उमेदवार सगुणा तलांडी यांच्या कार्यालयात गोंधळ घातला कार्यालयाची तोडफोड व मंडपाचे कपडे फाडून फेकले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला. दरम्यान, हे भाजप-शिवसेनेचे षडयंत्र असल्याचा आरोप तलांडी यांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ब्रम्हपुरीतील जाहीरसभेसाठी सगुणा तलांडी काही महिला कार्यकर्त्यांना घेऊन गेल्या होत्या. याच वेळी या रोजंदारीवरील कार्यकर्त्यां तेथे धडकल्या. आम्हाला प्रचारासाठी बोलावले होते. आता शंभर रुपये रोजी देत नाही म्हणून त्यांनी गोंधळ घातला.