महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजपची घोडदौड १२३ वरच अडकल्याने बहुमताची जुळवाजुळव सुरु करण्यासाठी शिवसेनेच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा पर्याय भाजप अजमावून पहात आहे. ताठर भूमिका न घेतल्यास शिवसेनेबरोबर, अन्यथा अपक्ष आमदारांची मदत घेऊन किंवा अखेरचा पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरुन पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करण्याचा पर्यायही अजमावला जात आहे. अपक्ष व लहान पक्षांतील किमान १२ आमदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपचे संख्याबळ १३५ पर्यंत गेले असून बहुमतासाठी भाजपला आणखी १० आमदारांची आवश्यकता आहे. मात्र सर्वात मोठा पक्ष भाजपच असल्याने आम्ही सरकारस्थापनेचा दावा करणार असल्याचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी सांगितले.शिवसेनेशी चर्चा करुन त्यातून फलनिष्पत्ती होण्यासाठी दोन दिवस वाट पाहिली जाणार आहे. राज्यात प्रथमच भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याने सुयोग्य मुहूर्तही पाहिला जात आहे. त्यामुळे गुरुवारी अमावस्या संपेपर्यंत बहुमताची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न केले जातील व त्यानंतर सरकारस्थापनेसाठी राज्यपालांकडे भाजपकडून पत्र दिले जाईल. ते शक्य झाले नाही, तर दिवाळीनंतर हा दावा करुन बहुमत सिध्द करण्याचा मार्ग स्वीकारला जाणार आहे.
नेतानिवड प्रक्रिया सुरु
सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.गृहमंत्री राजनाथसिंह आणि सरचिटणीस जे.पी. नड्डा यांना निरीक्षक म्हणून पाठविले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी आमदारांचा कल कोणत्या नेत्याकडे आहे, याची चाचपणी करुन अहवाल दिला जाईल आणि त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल. अन्यथा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरविण्याचे अधिकार केंद्रीय नेतृत्वाकडे सोपविण्याचा ठरावही मांडला जाण्याची शक्यता आहे.