20 September 2020

News Flash

सत्तेच्या चाहुलीने भाजप उमेदवारांवर ‘लक्ष्मीकृपा’

केंद्राप्रमाणेच राज्यातही भाजपप्रणित सरकार सत्तेवर येणार, असा आशावाद उद्योगपती व पक्षाच्या हिंतचिंतकांनी वाटत असल्याने त्यांनी भाजप उमेदवारांसाठी त्यांनी आपले हात सैल सोडले आहे.

| October 13, 2014 02:17 am

केंद्राप्रमाणेच राज्यातही भाजपप्रणित सरकार सत्तेवर येणार, असा आशावाद उद्योगपती व पक्षाच्या हिंतचिंतकांनी वाटत असल्याने त्यांनी भाजप उमेदवारांसाठी त्यांनी आपले हात सैल सोडले आहे. त्यामुळे उमेदवारांना आतापर्यंतच्या कोणत्याही निवडणुकीत झाले नाही, एवढे ‘लक्ष्मीदर्शन’ झाले आहे. केंद्रात सत्ता असल्याने पक्षानेही यावेळी उमेदवारांना भरघोस आर्थिक मदत केली असून त्यात एरवीच्या तुलनेत दोन ते चार पटीने वाढ झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांच्या खर्चावर आयोगाचे र्निबध असले तरी त्याचे कोणीही पालन करीत नसल्याचे चित्र आहे. भाजपने याआधी उमेदवारांची गरज पाहून २५ ते ५० लाखांपर्यंत अर्थसहाय्य केले होते. यावेळी केंद्रात सरकार आणि राज्यातही सत्ता मिळण्याची चिन्हे असल्याने भाजपचे हितचिंतक पुढे आले असून त्यांच्याकडून पक्षाला मिळणारी आर्थिक कुमक वाढली आहे. त्यामुळे यंदा आधीच्या दोन ते चार पटीपर्यंत अधिक आर्थिक मदत व प्रचार साहित्याची मदत पक्षाने अनेक उमेदवारांना केली आहे. उमेदवाराच्या खर्चावर आयोगाचे र्निबध असले तरी पक्षाकडून दिली जाणारी मदत त्या कक्षेत येत नाही, तसेच पक्षाच्या कुमकीबरोबरच उमेदवारांना परस्पर हितचिंतकांकडून मदत पाठविण्यात आली आहे.
मातब्बर व श्रीमंत उमेदवाराला पक्षाकडून अर्थसहाय्य दिले जात नाही. पण यावेळी सरसकट प्रचारसाहित्य पाठविण्यात आले. सुरुवातीला १३०-१३५ जागांच्या दृष्टीने प्रचारसाहित्याच्या ऑर्डर देण्यात आल्या होत्या. त्यानंतर युती तुटल्याने ही ऑर्डर दुप्पट करावी लागली. पक्षातर्फे दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्य व प्रचारसाहित्यात राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांनी लक्ष घालून काही कमी पडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भाजप-शिवसेनेत प्रचारयुद्ध
मुंबई : सोशल मीडिया, जाहिराततंत्र, गाणी आदी माध्यमांद्वारे शिवसेना व भाजप या पक्षांनी ‘आधुनिक’ प्रचाराला सुरुवात केली आहे. या माध्यमांद्वारे एकमेकांवर चिखलफेक करणाऱ्या पक्षांमध्ये आता प्रचारयुद्धच रंगले आहे. भाजपची ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ ही प्रचार मोहीम गाजली. मात्र शिवसेनेचीही ‘मी शिवसेना’ या मोहीमेतून त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपचे परराज्यातील नेते महाराष्ट्रात
मुंबई : केंद्रात सत्ता मिळाल्याने भाजप विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पूर्ण ताकदीनिशी उतरला असून केंद्रीय नेते, मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री अशी तब्बल ३०० ते ३५० नेत्यांची फौज महाराष्ट्रात उतरली आहे. गुजरात आणि उत्तर भारतीय नेत्यांना भाजपने मोठय़ा प्रमाणावर प्रचारासाठी उतरविले आहे. शहा यांनी त्यांच्यावर विभाग व जातीनिहाय प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 2:17 am

Web Title: bjp gets handsome amount as funds from business world
Next Stories
1 मोदी पंतप्रधान होण्यातील निम्मे श्रेय काँग्रेसचे – राज ठाकरे
2 अबब! एकाच घरात ७६ मतदार?
3 महाराष्ट्र लुबाडणाऱ्यांना जागा दाखवा!
Just Now!
X