News Flash

भाजपचा सेनेपुढे ‘५०-५०’ चा प्रस्ताव

महायुतीतील मित्रपक्षांसाठी जागा सोडल्यानंतर उरलेल्या जागांमधील प्रत्येकी ५० टक्के जागा दोन्ही पक्षांनी लढवायच्या, असा अधिकृत प्रस्ताव आता भाजपने शिवसेनेसमोर ठेवला आहे.

| September 4, 2014 04:42 am

महायुतीतील मित्रपक्षांसाठी जागा सोडल्यानंतर उरलेल्या जागांमधील प्रत्येकी ५० टक्के जागा दोन्ही पक्षांनी लढवायच्या, असा अधिकृत प्रस्ताव आता भाजपने शिवसेनेसमोर ठेवला आहे. यावर शिवसेनेकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही, अशी माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने आज ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याची वेळ जवळ येऊन ठेपली असली तरी अद्याप भाजप व शिवसेनेची जागा वाटपाची चर्चा सुरूच झालेली नाही. त्यामुळे युती होणार की नाही, यावरून राज्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकसभेतील निकालाच्या पाश्र्वभूमीवर भाजपला गेल्या वेळपेक्षा जागा वाढवून हव्या आहेत. शिवसेना त्यासाठी तयार नाही. त्यामुळे युतीत निर्माण झालेला तणाव कायम आहे. जागा वाटपाची चर्चा सुरू करण्यासाठी दोन्ही पक्षात जे अनुकूल वातावरण लागते ते सुद्धा सध्या दिसून येत नाही. ही कोंडी फोडण्यासाठीच आता भाजपने पुढाकार घेऊन हा नवा प्रस्ताव सेनेपुढे ठेवला आहे. महायुतीत सामील झालेल्या मित्रपक्षांना किती जागा सोडायच्या, यावरून भाजप व सेनेत एकवाक्यता नाही. दुसरीकडे या नव्या मित्रपक्षांची मागणी वाढतच आहे. त्यामुळे आधी मित्रपक्षांसाठी किती जागा सोडायच्या ते ठरवू आणि मग समसमान जागांवर लढू, असे भाजपकडून देण्यात आलेल्या प्रस्तावाचे स्वरूप आहे.
मित्रपक्षांसाठी समजा १८ जागा सोडण्याचे ठरले, तर २७० जागा शिल्लक राहतात. भाजप व शिवसेनेने प्रत्येकी १३५ जागा लढवाव्यात, अशी आकडेवारी या प्रस्तावात नमूद करण्यात आली आहे. मित्रपक्षांसाठी जास्त जागा सोडाव्या लागल्या तरी शिल्लक राहिलेल्या जागांचे वाटप समसमान होईल, अशी भूमिका भाजपने या प्रस्तावाच्या माध्यमातून सेनेकडे मांडल्याची माहिती एका ज्येष्ठ नेत्याने आज दिली.     
अमित शहांचा उद्धव भेटीचा कार्यक्रम नाही
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्या मुंबईत येत आहेत. त्यांच्या या भेटीत सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंना भेटण्याच्या कोणताही कार्यक्रम ठरलेला नाही. सेनेकडून भेटीचे निमंत्रण आले तर अमित शहा ठाकरेंना निश्चित भेटतील, असे या नेत्याने सांगितले. शहांची मुंबईभेट ही युतीतील तणाव वा जागावाटप यासाठी नाही तर संघटनात्मक पातळीवरील चर्चा करण्यासाठी आहे, असेही या नेत्याने स्पष्ट केले. पक्षाकडून देण्यात आलेल्या प्रस्तावावर सेनेकडून कसा प्रतिसाद येतो, याकडे भाजपच्या वर्तुळाचे आता लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 4:42 am

Web Title: bjp keeps 50 50 proposal to shiv sena
टॅग : Seat Sharing
Next Stories
1 मराठवाडय़ावर १५०० कोटींची ‘टोलधाड’
2 अमित शहा युतीबाबत स्वपक्षातील नेत्यांची मते आजमावणार
3 शिवसेनेच्या लेटरबॉम्बमुळे भाजप अस्वस्थ