अखंड महाराष्ट्रवादी असलेल्या शिवसेनेसोबत युती तुटली तरी यावेळी स्वबळावर संपूर्ण राज्यात यश मिळवायचे असल्याने भाजप निवडणुकीच्या काळात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ाला हात घालण्याची शक्यता कमी आहे. सेनेकडून मात्र याच मुद्दय़ावरून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्दय़ावर एकमत नसताना सुद्धा राज्याच्या राजकारणात भाजप व शिवसेनेची युती २५ वर्षे टिकली. भाजपने वेळोवेळी या मुद्दय़ाचे समर्थन केले तर शिवसेनेने तीव्र विरोध करतअखंड महाराष्ट्राचा पुरस्कार आजवर केला. आता हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढण्यासाठी सज्ज होत असताना विदर्भवादी संघटनांनी हा मुद्दा ऐरणीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन करणाऱ्या जनमंचने तसेच संयुक्त कृती समितीने युती तुटल्यामुळे आता स्वतंत्र विदर्भासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे, अशी निवेदने जारी केली असली तरी भाजपने मात्र सावध भूमिका घेतली आहे.
भाजपची सर्वाधिक ताकत विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात आहे. विदर्भात प्रचार करताना स्वतंत्र राज्याचा मुद्दा उपस्थित केला आणि नाही केला तरी भाजपला मिळणाऱ्या यशात फार फरक पडेल अशी स्थिती नाही, विदर्भात सेनेचे ४ खासदार व ८ आमदार असले तरी त्यांच्या विजयात भाजपचा वाटा मोठा होता ही बाब उघड आहे. विदर्भात सेनेची शक्ती मर्यादित असल्याने यावेळी भाजपला जागा वाढवण्याची संधी आयतीच चालून आली आहे. त्यामुळे विदर्भात प्रचार करताना स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा ठळकपणे समोर आणण्याची काहीच आवश्यकता नाही या निष्कर्षांप्रत भाजपचे नेते आले आहेत. यावेळी भाजपने सर्व लक्ष पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ावर केंद्रित करायचे ठरवले आहे. भाजपने केलेल्या विविध सर्वेक्षणात या दोन भागात पक्षाला यावेळी लक्षणीय यश मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आता स्वबळावर लढताना हा अंदाज खरा ठरवायचा असेल तर स्वतंत्र विदर्भाच्या मुद्याला न छेडणेच उत्तम असा मतप्रवाह पक्षात आहे. प्रचाराच्या काळात विदर्भाचा मुद्दा समोर केला तर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ात फटका बसू शकतो. त्यामुळे तूर्त या मुद्दय़ाला बाजूला ठेवण्यात आले आहे, असे भाजपच्या कोअर समितीतील एका नेत्याने आज ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. दुसरीकडे भाजपच्या रणनीतीला सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेने याच मुद्यावरून भाजपला डिवचण्याचे डावपेच आखले आहेत. विदर्भात प्रचार करताना स्वतंत्र राज्याचा मुद्दा काढायचा नाही, पण उर्वरित महाराष्ट्रात मात्र भाजप राज्याचे तुकडे करायला निघाला आहे असाच आरोप करायचा, असे सेनेच्या वर्तुळात ठरवण्यात आले आहे. सोशल साईटस्वर सक्रिय असलेल्या सेना नेत्यांकडून आता असा प्रचार सुरू झाला आहे. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी या मुद्दय़ावर भाजपची भूमिका सर्वाना ठाऊक आहे. राज्यात भाजपची सत्ता आली तर स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवू, अशी नरमाईची भूमिका त्यांनी घेतली.