29 September 2020

News Flash

भाजपला आघाडीची संधी; काँग्रेसची दयनीय अवस्था

युती आणि आघाडी दोन्ही मोडीत निघाल्यानंतर राज्यातील चारही प्रमुख पक्ष स्वबळावर रिंगणात उतरले असले, तरी दोन्ही काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या या जिल्हय़ात चारही पक्षांचे संख्याबळ फारसे

| October 13, 2014 01:53 am

युती आणि आघाडी दोन्ही मोडीत निघाल्यानंतर राज्यातील चारही प्रमुख पक्ष स्वबळावर रिंगणात उतरले असले, तरी दोन्ही काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या या जिल्हय़ात चारही पक्षांचे संख्याबळ फारसे बदलणार नाही, अशीच स्थिती सुरुवातीला स्थिती होती. आताही त्यात बदल झाला नसला, तरी भाजपने ऐनवेळी दोन्ही काँग्रेसकडून घाऊक प्रमाणात उमेदवार आयात केल्याने हे चित्र बदलले. त्यामुळेच बारापैकी आठ lok10मतदारसंघात भाजप मुख्य लढतीत आला आहे. अन्य पक्षांची तशी स्थिती नाही. काँग्रेस चारच ठिकाणी लढतीत आहे, राष्ट्रवादी सात जागांवर आणि शिवसेना पाच ठिकाणी लढतीत आहे.
या लढतींच्या चित्रातच जिल्हय़ातील बारा जागांचा निकाल सामावलेला आहे. गेल्या निवडणुकीत श्रीगोंदे (बबनराव पाचपुते), शेवगाव (चंद्रशेखर घुले), अकोले (मधुकर पिचड) आणि नेवासे (शंकरराव गडाख) अशा चार जागा राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. यातील नेवासे वगळता अन्य सर्व जागांवर त्यांना झुंजावे लागत आहे.
कर्जत-जामखेड (राजेंद्र फाळके), नगर शहर (संग्राम जगताप) व पारनेरमध्येही (सुजित फाळके) ते लढतीत आहेत. अन्य पाच जागांवर राष्ट्रवादीचे अस्तित्वच नाही. संगमनेर (माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात) व शिर्डी (माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे) या दोन जागांवर काँग्रेसला विजयाची निश्चिंती आहे. तिसरा आमदार असलेल्या श्रीरामपूर (आमदार भाऊसाहेब कांबळे) मतदारसंघातील निवडणूक या वेळी चुरशीची झाली आहे. नगर शहरात (सत्यजित तांबे) त्यांनी चांगले आव्हान उभे केले आहे, उर्वरित तब्बल आठ मतदारसंघांत मात्र काँग्रेसची दयनीय अवस्था आहे.
अकोले (अशोक भांगरे), कोपरगाव (स्नेहलता कोल्हे), श्रीरामपूर (भाऊसाहेब वाकचौरे), राहुरी (आमदार शिवाजी कर्डिले), शेवगाव-पाथर्डी (मोनिका राजळे), कर्जत-जामखेड (आमदार राम शिंदे), श्रीगोंदे (माजी मंत्री बबनराव पाचपुते) आणि नेवासे (बाळासाहेब मुरकुटे) अशा आठ ठिकाणी भाजपच लढतीत आहे. पूर्वीच्या जागा राखण्यासाठी त्यांना झुंजावे लागले, मात्र त्यामुळेच त्यांच्या जिल्हय़ातील आघाडीची शक्यता वाढली lok09आहे. शिवसेनेचे जिल्हय़ात सध्या तीन आमदार आहेत. यातील नगर (आमदार अनिल राठोड), पारनेर (आमदार विजय औटी) आणि कोपरगाव (आशुतोष अशोक काळे) या तीन जागांसह श्रीरामपूर (लहू कानडे), कर्जत-जामखेड (रमेश खाडे) अशा पाच जागांवर शिवसेना लढतीत आहे. अन्य जागांवर त्यांना फारशी संधी नाही.
राज्यातील चारही प्रमुख पक्ष स्बळावर रिंगणात उतरल्याने यंदा उमेदवारांपासून नेते व कार्यकर्त्यांच्या पातळीवरही जिल्हय़ातील बाराही मतदारसंघांत कमालीची सरमिसळ आहे. यातील नेते व कार्यकर्त्यांच्या पातळीवरील सरमिसळ निकालाच्या दृष्टीने गोंधळात टाकणारी आहे. विविध राजकीय पक्षांचे निष्ठावान म्हटले जाणारे अगदी पहिल्या फळीतील नेतेही खुले आम दुसऱ्याच उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय आहेत.
अपवाद वगळता बहुसंख्य मतदारसंघात हेच चित्र असून त्याचा परिणाम काय होईल, याचा अंदाज येत नसल्याने ही स्थिती गोंधळात टाकणारी वाटते. एकुणात आमदारांच्या संख्येत वाढ करण्याची संधी एकटय़ा भाजपलाच आहे. काँग्रेस अपवाद वगळता पूर्वीचे मतदारसंघ निश्चितपणे राखील, शिवसेनेचे मतदरासंघ बदलू शकतील, मात्र संख्याबळ कमी-अधिक फरकाने कायम राहील.
मागच्या जागा टिकवण्यात राष्ट्रवादीला मात्र मोठीच कसरत करावी लागेल. ती शक्य न झाल्यास ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा प्रभाव असलेल्या नगर जिल्हय़ात त्यांची प्रथमच मोठी पीछेहाट होऊ शकते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये नगर जिल्हय़ात कायमच निकालात फरक पडतो. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्य़ातील दोन्ही जागा जिंकताना भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीने बारापैकी अकरा विधानसभा मतदारसंघात मोठी आघाडी घेतली. तसे विधानसभा निवडणुकीत होणार नाही. गेल्याही वेळी तसे झाले नव्हते. राज्यातील चारही प्रमुख पक्ष आता स्वबळावर रिंगणात उतरले असले तरी नगर जिल्हय़ात अपवाद वगळता प्रस्थापितांना निवडणूक सोयीचीच झाली आहे. मात्र तरीही भाजपने जिल्हय़ात मोठे आव्हान उभे केले असून, सध्याच आठ मतदारसंघांत ते प्रमुख लढतीत आहेत. अन्य तिन्ही पक्षांच्या संख्येत फारसा बदल होईल, असे दिसत नाही. अशीच स्थिती झाली तर भाजपच आघाडी घेऊन जिल्हय़ात सर्वाधिक जागा जिंकू शकतो. यात सर्वात मोठा फटका राष्ट्रवादीलाच बसण्याची चिन्हे आहेत.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 1:53 am

Web Title: bjp may beat congress in ahmednagar
Next Stories
1 संजय देवतळेंना ‘भागवत’दर्शनाची आस
2 विखे-थोरातांची ‘सामना-निश्चिती’!
3 येवल्यामध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराची माघार
Just Now!
X