महायुतीतील लहान पक्षांना १८ जागा देण्याचे जाहीर करुन भाजपवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेनेवर घटक पक्षांमधील नाराजीचा अचूक मारा करीत भाजपने धूर्तपणे सेनेचा डाव उलटविला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर विरुद्ध शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यात मंगळवारी रात्री भर बैठकीत उडालेली चकमक, यातून शिवसेनेच्या विरोधात महायुती उभी करण्याची भाजपची खेळी यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे भाजप व शिवसेना दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसंग्राम या लहान पक्षांचा खुबीने वापर करीत आहेत.
*जागावाटपावरुन ताणाताणी सुरु असतानाच, भाजपचे नेते विनोद तावडे यांनी शनिवारी घटक पक्षांना एकही जागा द्यायची नाही, त्यांना थेट मंत्रीपदे देऊ, असा शिवसेनेचा प्रस्ताव आल्याचे सांगून वादाला तोंड फोडले. हा प्रस्ताव अमान्य केल्याचे सांगत त्यांनी भाजपची बाजूही सुरक्षित केली. त्यावर घटक पक्षांना सेनेपासून तोडण्याचा हा डाव आहे, असा आरोप सेनेचे रामदास कदम यांनी केला होता.
*रविवारी शिवेसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घटक पक्षांना शिवसेनेच्या कोटय़ातून १८ जागा देण्याचे जाहीर करुन लहान पक्षांना सेनेच्या विरोधात उभे करण्याची भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटवून लावली. शिवसेना-१५१, भाजप-११९ आणि घटक पक्ष-१८ असे जागावाटपाचे सूत्र जाहीर करुन, घटक पक्षांना आपल्या बाजूला वळवत भाजपला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला.
*उद्धव ठाकरेंच्या चलाखीने भाजपमध्ये अस्वस्थता परसरली. परंतु लगेच सावध होऊन, ‘आता चर्चा बंद’ असा पवित्रा घेत, घटक पक्षांना बरोबर घेण्याची चाचपणी सुरु केली. राजू शेट्टी यांना बैठकीसाठी भाजपकडूनच निरोप गेला. पंकजा मुंडे-पालवे व महादेव जानकर यांच्यात बैठक झाली. भाजपमधील या हालचाली शिवसेनेला अस्वस्थ करायला लावणाऱ्या होत्या.
*घटक पक्षांना बरोबर घेऊनच चर्चा करायची असे दोन्ही पक्षांचे ठरले. रात्री वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये बैठक सुरु झाली. शिवसेना १५१ च्या खाली यायला तयार नव्हती, भाजपला १३० जागा देऊ केल्या आणि घटक पक्षांना ७ जागा देण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यावर राजू शेट्टी व जानकर यांच्या उद्रेकाचा स्फोटच झाला. ‘आम्ही भीक मागायला आलो काय’, या शेट्टी यांच्या सवालाने सेना नेते पुरते घायाळ झाले.