केंद्रात सत्ता मिळाल्याने भाजप विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पूर्ण ताकदीनिशी उतरला असून केंद्रीय नेते, मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री अशी तब्बल ३०० ते ३५० नेत्यांची फौज महाराष्ट्रात उतरली आहे. गुजरात आणि उत्तरभारतीय नेत्यांना भाजपने मोठय़ा प्रमाणावर प्रचारासाठी उतरविले आहे. कोणत्याही पक्षापेक्षा ही फौज मोठी असून भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणूक तंत्रानुसार त्यांच्यावर विभाग आणि जातीनिहाय प्रचाराची जबाबदारी वेगवेगळ्या टप्प्यात सोपविण्यात आली.
युतीच्या जागावाटपाची चर्चा सुरु असल्यापासूनच प्राथमिक तयारीसाठी एका केंद्रीय मंत्र्याने राज्यातील प्रत्येक मतदारसंघात जाऊन आढावा घेतला व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. बूथनिहाय तयारीला त्यातून वेग आला. प्रचाराच्या पुढील टप्प्यात केंद्रीय मंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते यांना राज्यातील प्रत्येक भागात पाठविण्यात आले आहे. शिवराजसिंह चौहान, आनंदीबेन पटेल, मनोहर र्पीकर यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले. मतदारसंघात उत्तरभारतीय, गुजराती भाषिक किंवा अन्य वर्गीय मतदारांचे प्रमाण किंवा त्या नेत्यांचा प्रभाव कोठे आहे, हे पाहून या सभा ठरविण्यात आल्या होत्या.  त्यामुळे अनेक राज्यातील भाजपच्या नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची फौज सध्या महाराष्ट्राच्या विविध विभागात तळ ठोकून आहे.
मुंबई व ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला. त्याला भगदाड पाडण्यासाठी जाती व भाषेच्या राजकारणानेच उत्तर देण्याची व्यूहरचना भाजपने केली आहे. मुंबईत उत्तरभारतीय व गुजराती भाषिकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या राज्यांमधील मंत्री, खासदार, आमदार यांची पथके मुंबई, ठाणे जिल्ह्य़ात तळ ठोकून आहेत. जातीनिहाय किंवा समाजाच्या लोकांचे मेळावे व छोटय़ा बैठका पार पडत आहेत. आपल्या गावातील नेते प्रचारासाठी आल्याचे पाहून गुजराती व उत्तर भारतीय नेत्यांना साहजिकच त्यांच्याबद्दल आकर्षण वाटते. त्याचा लाभ शिवसेनेविरोधात उठविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

भाजप-सेनेत प्रचारयुद्ध
सोशल मीडीयावर व जाहिरात तंत्रात भाजपची ताकद असताना यंदा शिवसेनेनेही त्यात आघाडी घेतली असून भाजपचा चोख प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेची गाणी, व्हॉट्स अ‍ॅप संदेश व अन्य माध्यमातून केल्या जात असलेल्या प्रचाराने भाजपच्या प्रचाराला जोरदार उत्तर दिल्याचे दिसून येत आहे. भाजपची‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ ही प्रचार मोहीम बरीच गाजली. मात्र शिवसेनेचीही ‘मी शिवसेना’ या मोहीमेतून चांगलेच प्रत्युत्तर देण्यात आले. भाजप सोशल मीडीयावर चर्चा घडविण्यात व संदेश पाठवून अन्य पक्षीयांविरोधात प्रचार करण्यात आघाडीवर असतो. पण शिवसेनेनेही वेगवेगळ्या संदेशांच्या माध्यमातून त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.