युतीतील तेढ संपविण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’ चे निमंत्रण स्वीकारले, तरी सेना-भाजपमधील जागावाटपाचा तिढा मात्र कायम आहे. राष्ट्रीय पक्ष असलेला भाजप हाच मोठा भाऊ असताना, लोकसभेच्या निवडणुकीत १९८९ पासून तो लहान होत होत २६ वर आला, आता विधानसभेसाठी भाजपला अधिक जागा मिळायलाच हव्यात, अशी ठाम भूमिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज मांडली. शहा यांच्या मुंबई भेटीनंतर लगेचच त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे, जागावाटपाच्या मुद्दय़ावर युतीत निर्माण झालेला तिढा अजूनही कायमच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यापुढेही आपण ही भूमिका मांडली आहे, असे खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. युतीचा व जागावाटपाचा निर्णय स्थानिक नेते घेतील, असे काल शहा यांनी स्पष्ट केले आहे. काल रात्री मातोश्री भेटीत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी जागावाटपाच्या मुद्दय़ावर त्रोटक चर्चा केली. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशी चर्चा करुन अनिर्णित मुद्दय़ांवर केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल, हेही त्यांनी नमूद केले. घटकपक्षांचे जागावाटप करुन उर्वरित जागांचे निम्म्या प्रमाणात वाटप व्हावे, ही भाजपची मागणी कायम आहे. तर शिवसेना जुन्या सूत्रावर कायम आहे. मानापमान नाटय़ रंगण्यापेक्षा युतीत बोलणी सुरु व्हावी, यासाठी संवादाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काल शहा यांनी केला.
दरम्यान, खडसे यांनीही भाजपच्या भूमिकेचे ठाम समर्थन केले आहे. ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील सुरुवातीला ठरलेल्या सूत्राचा विचार केला, तर १९८९ मध्ये भाजपने ३२ जागा लढविल्या होत्या. त्यानंतर भाजपकडून शिवसेनेने प्रत्येक निवडणुकीच्या वेळी थोडय़ा थोडय़ा करीत जागा मिळविल्या. अगदी ठाण्यातील राम कापसे यांच्यासारख्या निवडून आलेल्या खासदाराची जागाही भाजपने शिवसेनेला दिली. आता भाजप २६ वर आला आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना खासदारकी देण्यासाठी भाजपने विद्यमान खासदार प्रकाश जावडेकरांची जागा दिली, याची आठवण खडसे यांनी करुन दिली. एक लोकसभेची जागा म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघ, याचा विचार करता भाजपला अधिक जागांची मागणी करण्यात गैर काहीच नाही, ते साहजिकच आहे, असे खडसे यांनी स्पष्ट केले.
तणाव निवळण्यासाठी
उद्धव ठाकरे यांची भेट न घेतल्यास तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही अवमान होईल आणि त्यामुळे त्यांना मानणारा कार्यकर्ता व मराठी माणूस भाजपवर नाराज होईल. युतीच्या चर्चेतही अडथळा येईल, याचा अंदाज भाजप नेत्यांना आला. शहा यांनी खासदार अनिल देसाई व संजय राऊत यांचे दूरध्वनी  घेतलेही नाहीत. अखेर उद्धव ठाकरे यांचा दूरध्वनी आल्यावर त्यांनी ‘मातोश्री’ चे आमंत्रण स्वीकारले. मात्र शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळी जावून त्यांना अभिवादन करण्याची इच्छा त्यांनी स्वतहून प्रकट केली.