विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज शनिवापर्यंत भरता येणार आहेत. मात्र युती आणि आघाडीमध्ये अपेक्षित समझोता झालेला नसल्याने चारही पक्षांच्या उमेदवारांची कोंडी होऊ लागली आहे. या पाश्र्वभूमीवर ‘मिटवा ही भांडणे आणि एकत्रच मतदारांना सामोरे जा!’ असाच सूर सर्वसामान्य मतदारांनी, विशेषत: युतीच्या संदर्भात लावला आहे.आत्ताच हे असे, पुढची पाच वर्षे कलगीतुरा? चालणार काय अशीच सामान्यांची भावना आहे.  केवळ अधिक जागा मिळवून शिवसेनेचा आमदार मुख्यमंत्री होऊ नये यासाठी भाजपने जागावाटपावरून वाद निर्माण केला आहे.
जागावाटपावरून महायुतीत एवढा गोंधळ सुरू आहे. मग भविष्यात महायुती टिकून शिवसेना-भाजपाच्या हाती महाराष्ट्राची सत्ता हाती आली तर मंत्रीपदांवरून आगडोंब उसळेलआणि पुढची पाच वर्षे महाराष्ट्राला कलगीतुऱ्याचे सामने पाहावयास मिळतील.
 – संध्या बहाडकर, गिरगाव

महागाई, बेरोजगारी अशा अनेक समस्यांमुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. पर्याय म्हणून महायुतीकडे पाहिले जात आहे. अशा वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मन मोठे करीत उद्धव ठाकरे यांनी मित्र पक्षांना समजून घ्यायला हवे.
– विवेक काणकोणकर, खासगी कंपनीतील अधिकारी

गेली २५ वर्षे शिवसेना-भाजप युती अभेद्य होती.काही वेळा बाका प्रसंग निर्माण झाला. आता उभय पक्षांनी जागा वाटपाचा गुंता अधिक वाढवू नये. तसेच सरकार स्थापनेची संधी मिळाली तर मंत्रीपदांवरून भांडणे उद्भवू नयेत याची काळजी आताच घ्यावी.
 – विनय रहातेकर