भाजप व शिवसेनेने युती टिकविण्याची इच्छा प्रदर्शित करीत स्वबळाची तयारी सुरूच ठेवली आहे. त्यामुळे महायुतीत ताटातूट होण्याची चिन्हे गडद झाली असून, युती तरी राहील किंवा घटक पक्ष शिवसेना अथवा भाजपसोबत राहतील, अशी शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणार असून शिवसेनेच्या उमेदवारांची यादी ते देवीचरणी ठेवतील. त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी महायुतीच्या भवितव्याचे चित्र स्पष्ट होईल. रात्री उशिरापर्यंत तिढा सोडवण्याचे प्रयत्न सुरु होते.
शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे महायुतीतील घटक पक्षांशी चर्चेचे गुऱ्हाळ बुधवारीही सुरू होते. भाजपला १३०, शिवसेना १५१ आणि घटक पक्षांना सात जागा देण्याचा प्रस्ताव शिवसेनेने दिला असताना तो भाजपनेच दिला आहे, असे घटक पक्षांना भासविण्यात आले.
 घटक पक्षांनी भाजपची साथ सोडून शिवसेनेकडे यावे, यासाठी दिवसभर शिवसेना नेत्यांनी प्रयत्न केले. स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी, रासपचे महादेव जानकर, रिपब्लिकन पक्षाचे अर्जुन डांगळे आणि शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांनी शिवसेना व भाजप नेत्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या. भाजप व शिवसेना दोन्ही पक्षांचा आम्हाला अंदाज आला नाही आणि त्यांनी पाठीत खंजीर खुपसला, अशी भावना या नेत्यांनी व्यक्त केली. मात्र त्यानंतर चर्चेच्या फेऱ्या झाल्या आणि महायुतीतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वाभिमानी पक्षाला ७, रिपब्लिकन पक्षाला २, रासपला ३ आणि शिवसंग्राम पक्षाला २ असा घटक पक्षांच्या जागावाटपाचा नवीन प्रस्ताव शिवसेनेकडून देण्यात आल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. अनंत गीते यांच्याऐवजी केंद्रीय मंत्रिपदाचे गाजर रामदास आठवले यांच्यासाठी दाखविण्यात आले. मात्र घटक पक्षांनी तो प्रस्ताव फेटाळला, असे सूत्रांनी स्पष्ट केले. घटक पक्षांच्या सर्वच जागा घ्या आणि रामदास आठवले व महादेव जानकर यांना प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद द्यावे, असा प्रस्ताव राजू शेट्टी यांनीच बैठकीत मांडला. जागावाटपाचे विविध अंकगणित मांडणारे अनेक प्रस्ताव बुधवारी  मांडले जात होते व धुडकावून लावले गेले. शिवसेना १५१ जागांवर ठाम असून भाजप फार तर १२५ जागांपर्यंत उतरेल, अशी शक्यता भाजपच्याच सूत्रांनी वर्तविली. पण शिवसेनेने आपल्या कोटय़ातील जागा कमी केल्याखेरीज हे शक्य नाही. त्यामुळे महायुतीत ताटातूट झाल्याशिवाय युतीचीही मोट बांधली जाणार नाही, असे सुत्रांनी सांगितले.
प्रीतम खाडे यांना बीडची उमेदवारी
ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून त्यांची कन्या डॉ. प्रीतम खाडे यांना उमेदवारी देण्याची शिफारस प्रदेश सुकाणू समितीने केली आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळण्याची अपेक्षा आहे.
घटक पक्षांना बरोबर घेणार
लोकसभेच्या निवडणुका घटक पक्षांना बरोबर घेऊन लढल्याने त्यांना विधानसभेसाठी सोबत घेणारच, असे भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे भाजप घटक पक्षांना घेऊन स्वबळावर वाटचाल करण्याची चिन्हे आहेत.