भाजपचे चांदिवलीतील उमेदवार सीताराम तिवारी यांनी अर्जातील मालमत्ताविषयक रकाने व अन्य काही माहिती न भरल्याने त्यांचा अर्ज तांत्रिक कारणावरून निर्वाचन अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. प्रबळ प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या फायद्यासाठी अर्जात जाणूनबुजून त्रुटी ठेवण्यात आल्याची चर्चा असून यामागे मोठे ‘अर्थपूर्ण’ राजकारण असल्याची चर्चा आहे. मात्र त्यामुळे स्बळावर लढत असलेल्या भाजपचे मात्र चांगलेच नाक कापले गेले आहे.
काँग्रेसचे मंत्री नसीम खान या मतदारसंघातून निवडणूक लढवीत असून उत्तर भारतीय संघाचे आर. एन. सिंह यांचे चिरंजीव संतोष सिंह शिवसेनेचे उमेदवार आहेत. हा अर्ज फेटाळला गेल्याचे कळताच खासदार पूनम महाजन यांनी तातडीने अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. मात्र त्यांनी अर्जातील त्रुटी दाखवून दिल्या.
तांत्रिक बाबींवर अर्ज फेटाळले जाऊ शकतात, हे लक्षात घेऊन अर्ज योग्य रीतीने भरले जातील आणि वेळ पडल्यास डमी उमेदवारांनीही अर्ज भरून ठेवावेत, अशी व्यूहरचना भाजपने केलेली नाही. पक्षाच्या मुंबई पदाधिकाऱ्यांनी योग्य ती काळजी न घेतल्याने तसेच या मतदारसंघात उमेदवार ठरवितानाही फारसा विचार वरिष्ठ नेत्यांनी न केल्याने ही पाळी आली आहे, असे पक्षातील नाराज उघडपणे बोलत आहेत.
शिर्डीत मनसे रिंगणाबाहेर
राहाता  :  शिर्डी विधानसभा मतदारसंघात छाननीत पाच अर्ज बाद झाले. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दत्तात्रय कोते व शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राजेंद्र पठारे या दोघांचा समावेश आहे. कोते यांचा अर्ज बाद झाल्याने या मतदारसंघात आता मनसेचा उमेदवार िरगणात राहणार नाही. या मतदारसंघातून शेखर बोऱ्हाडे यांना मनसेची उमेदवारी मिळणार होती. ऐनवेळी त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवत अर्ज दाखल केला. त्यामुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते यांनी पक्षाचा एबी फॉर्म घेऊन मनसेकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र तो बाद ठरला.
परभणीत १० अर्ज अवैध
जिंतूर मतदारसंघात २, परभणी २, गंगाखेड ५ व पाथरीत एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले. गंगाखेडमध्ये मनसेचे बालाजी मुंढे, सेनेचे कालिदास कुलकर्णी, भाजपचे सुभाष कदम, बाळासाहेब जोंधळे, विठ्ठल साखरे, परभणीत गंगाधर जवंजाळ, समाधान पोटभरे आणि जिंतूर येथे बसपचे कपिल खिल्लारे व भाजपचे अ‍ॅड. जितेंद्र घुगे यांचे अर्ज अवैध ठरले.