राज्यात सत्तास्थापनेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत भाजपने मंगळवारी मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीची निवड करण्याचे जाहीर केले आहे. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी मुंबईत होणाऱ्या बैठकीत भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार असून ३० ऑक्टोबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याचे समजते. दरम्यान, राज्यातील सत्तेत सहभागी होण्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला तरच शिवसेनेची मदत घ्यायची, अन्यथा अल्पमतातील सरकार स्थापन करायचे, अशी स्पष्ट भूमिका भाजपने घेतली आहे.
भाजपला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेतील अनेक आमदार इच्छुक आहेत, मात्र सेनेच्या पक्षनेतृत्वाने आडमुठी भूमिका घेतल्याने त्यांच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन करण्याच्या हालचाली भाजपने चालवल्या आहेत. शिवसेनेच्या अटी मान्य करू नयेत, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार या नेत्यांनी घेतली आहे. तर विनोद तावडे, पंकजा मुंडे व अन्य काही नेते शिवसेनेला बरोबर घेऊन सरकार स्थापन करण्याच्या बाजूने आहेत. ‘आम्ही शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्यास उत्सुक आहोत, मात्र त्यांनी अटी घालू नयेत. आधी मनाने एकत्र आल्यावर शर्ती किंवा खात्यांबाबत नंतर चर्चा होऊ शकते,’ असे तावडे यांनी रविवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला किंवा नाही तरी २८ ऑक्टोबर रोजी भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची निवड होऊन सरकार स्थापनेसाठी दावा करण्यात येईल. तसेच ३० ऑक्टोबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होईल, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.
शक्तीपरीक्षा सभागृहातच!
महाराष्ट्रानंतर भाजपचे ‘मिशन दिल्ली’
राज्यातील राजकीय घडामोडींबाबत विदर्भातील भाजप आमदार अनभिज्ञ