रिझव्‍‌र्ह बँकेचे तीन विभाग दिल्लीत हलविणे, मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा विकून गोदी व्यवसाय गुजरातमध्ये स्थलांतरित करण्याचा डाव, वांद्रे-कुर्ला संकुल ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करून मुंबईतील हिरे व्यापार तेथे थाटण्याचा प्रयत्न यातून मुंबईचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा कुटिल डाव असल्याचा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी बुधवारी केला. काँग्रेसच्या प्रचारात मुंबईचे महत्त्व कमी करण्याच्या भाजपच्या मुद्दय़ावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
गेल्या जुलै महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेचे तीन विभाग नवी दिल्लीला हलविण्यात आले. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी रिझव्‍‌र्ह बँक दिल्लीला हलविण्याचा प्रयत्न केला होता, पण तत्कालीन वित्तमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधानंतर हा प्रयत्न सोडून देण्यात आला, अशी माहिती राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, पण या आर्थिक राजधानीचा कणा मोडून काढण्याचा प्रयत्न मोदी सरकारने सुरू केला आहे. मुंबई पोट्र ट्रस्टची १८०० एकर जमीन विकसित करण्याची योजना वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली. सुमारे ७५ हजार कोटी किंमतीची ही जमीन भाजपच्या जवळच्या एका उद्योगपतीच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे. रासायनिक टर्मिनल जवाहरलाल नेहरू बंदरात स्थलांतरित करून, जहाजांची ये-जा गुजरातमधील मुंद्रा बंदरात करण्याचा डाव आहे असा आरोप ही राणेंनी केला.