नागपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी असलेल्या उपराजधानीत पूर्वी काँग्रेसचे वर्चस्व असताना गेल्या विधानसभा निवडणुकीत नागपुरातील सहा जागांपैकी चार मतदारसंघांत भाजपने वर्चस्व मिळविले होते. तर दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीत संघाच्या भूमीत बऱ्याच वर्षांनंतर कमळ फुलले. सहाही विधानसभा मतदारसंघांत भाजपने मोठय़ा प्रमाणात आघाडी मिळविली असताना ती विधानसभा निवडणुकीत कायम राहण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. नितीन गडकरी यांची नागपूर शहरावर असलेली पकड लक्षात घेता त्यांचा निर्णय हा अंतिम असला तरी सध्या शहरात वाडा आणि बंगला ही कार्यकर्त्यांसाठी दोन केंद्रस्थाने झाली आहेत. त्यामुळे एखादा निर्णय बंगल्यावरून घेतला तरी वाडय़ावरून त्याला संमती मिळेलच, असे नाही. बहुधा सर्व निर्णय वाडय़ावरून होत असतात. वाडा आणि बंगल्यामध्ये थोडेफार वाद असले तरी दोन्ही नेत्यांसमोर शहरातील अणि जिल्ह्य़ातील सहा-सहा जागा मिळविणे पक्षासमोर आव्हान आहे. दुसरीकडे पक्षांतर्गत नेत्यांमध्ये असलेले वाद, कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणे आदी गोष्टींमुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मताधिक्य घटले.
पूर्व नागपूर
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला पूर्व मतदारसंघ गेल्या निवडणुकीत भाजपने काबीज केला होता. या ठिकाणी भाजपचे कृ ष्णा खोपडे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा पराभव केला होता. गेल्या पाच वर्षांत खोपडे यांनी केलेली विकासकामे आणि लोकसभा निवडणुकीत वाढलेले मताधिक्य बघता भाजपची या मतदारसंघात ताकद वाढली असली तरी काँग्रेसचे सतीश चतुर्वेदी पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत असताना त्यांना दक्षिण नागपूर मतदारसंघात पाठविण्यात आले. कृष्णा खोपडे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. व्यापारी, मध्यमवर्गीयांपासून झोपडपट्टीतील मतदारांची संख्या या मतदारसंघात आहे.
दक्षिण नागपूर
महायुती असताना हा मतदारसंघ आतापर्यंत शिवसेनेकडे असला तरी या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असल्यामुळे शिवसेना तरून जात होती. मात्र, या वेळी महायुती संपुष्टात आल्यामुळे शिवसेनेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दक्षिण नागपूरवर पूर्वी काँग्रेसचे वर्चस्व असले तरी लोकसभा निवडणुकीत भाजपला या मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळाले होते. बहुजन समाज पक्षाची या मतदारसंघावर चांगली पकड आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे असलेल्या या मतदार संघात या वेळी विविध पक्षांतील उमेदवारांची गर्दी आहे.
दक्षिण-पश्चिम नागपूर
दक्षिण-पश्चिम मतदारसंघ गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला म्हणून नावारूपास आल्यानंतर या मतदारसंघास विशेष महत्त्व आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस या मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर या वेळी ते पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. पश्चिमचा बहुतांश भाग आणि दक्षिणचा काही भाग मिळून नवीन दक्षिण-पश्चिमची निर्मिती झाली. त्यामुळे मतदारसंघांची संख्या गेल्या निवडणुकीत पाचवरून सहा झाली. भाजपत येथून अनेक दावेदार असले तरी प्रदेशाध्यक्षांमुळे एकही नाव समोर आलेले नाही. नव्या मतदारसंघात जुन्या पश्चिमचे १४, तर दक्षिणचे ७ वॉर्ड जोडण्यात आले. सध्या पश्चिम नागपूर भाजपकडे, तर दक्षिण नागपूर काँग्रेसकडे होता. आता दोन्ही मतदारसंघांच्या अध्र्या-अध्र्या भागावर दोन्ही पक्षांची पकड आहे.
पश्चिम नागपूर
भाजपचा बालेकिल्ला म्हणून नावारूपास आलेला हा मतदारसंघ या वेळी कायम ठेवण्यासाठी भाजपला कमालीची कसरत करावी लागली. भाजपाचे सुधाकरराव देशमुख फारच कमी मताधिक्याने विजयी झाले होते. या वेळी गटबाजी आणि इच्छुकांची मोठी संख्या ही काँग्रेस आणि भाजपसाठी डोकेदुखी ठरणारी आहे. या वेळी पुन्हा सुधाकरराव देशमुख रिंगणात आहेत. सर्वात मोठय़ा पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे पुनर्रचनेत विभाजन करून दक्षिण-पश्चिम हा नवा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. २२ वॉर्ड आणि सरासरी सव्वातीन लाख मतदार असलेल्या तसेच सुशिक्षित आणि चाकरमान्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघाचे नेतृत्व पूर्वी देवेंद्र फडणवीस करीत होते.
उत्तर नागपूर
नेहमीच काँग्रेसच्या झोळीत भरभरून मते टाकणाऱ्या या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघात विरोधकांकडे प्रबळ उमेदवार नाही, ही बाब काँग्रेसच्या पथ्यावर पडणारी ठरली असली तरी या वेळी मात्र चित्र वेगळे आहे. विद्यमान आमदार आणि राज्याचे मंत्री नितीन राऊत यांना स्थानिकांकडून होणारा विरोध आणि लोकसभेतील भाजपचे वाढते मताधिक्य बघता काँग्रेसच्या हातून हा गड जाण्याची शक्यता आहे. बसपा आणि रिपब्लिकन पक्षाचे या मतदारसंघात प्राबल्य आहेत. कधी काळी रिपब्लिकन चळवळीचे केंद्रबिंदू ठरलेला, पण नंतरच्या काळात विविध गटांत शक्ती विभागली गेल्याने रिपाइंची येथील पकड कमी झाली. एकही उमेदवार येथून दुसऱ्यांदा विजयी झाल्याची नोंद गेल्या निवडणुकीपर्यंत नव्हती.
मध्य नागपूर
मुस्लीम आणि हलबा समाजाचे प्राबल्य असलेल्या मध्य नागपुरात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपचे विकास कुंभारे काँग्रेसच्या डॉ. राजू देवघरेंचा पराभव करून विजयी झाले होते. पूर्वी काँग्रेसचा गड असलेल्या मध्य नागपूरचे प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री अनिस अहमद गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पश्चिम नागपुरात पराभूत झाले होते. मात्र, या वेळी ते मध्य नागपुरातून निवडणूक लढवीत आहेत. भाजपचे वर्चस्व असलेला पूर्व नागपुरातील बराच भाग या मतदारसंघात समाविष्ट झाला आहे. या मतदारसंघात मनसे, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बहुजन समाज पक्षाने उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.