पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. त्यासाठी अमित शहा तसेच अनेक केंद्रीय मंत्र्यांना प्रचारासाठी राज्यात यापूर्वीच धाडले असून आता भाजपच्या गुजरातमधील २६ खासदार ११८ आमदार आणि २७५ नगरसेवकांना महाराष्ट्राचे तख्त काबीज करण्याच्या मोहिमेसाठी पाठविण्यात आले आहे. गेल्या आठवडय़ापासून टप्प्याटप्प्याने ही कुमक महाराष्ट्राच्या स्वारीवर आली असून मुंबई, ठाण्यातील ६० भाजप उमेदवारांच्या प्रचारात ते सहभागी आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या top03आदेशानुसार गुजरातचे पोलीसही बंदोबस्तासाठी यापूर्वीच डेरा टाकून बसले आहेत.
ऐनवेळी शिवसेनेबरोबर युती तुटल्याने अनेक ठिकाणी भाजपला आयारामांना संधी द्यावी लागली तर काही ठिकाणी अतिशय नवखे उमेदवार द्यावे लागले. या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदी राज्यभर सभा घेत असून आतापर्यंत १७ सभा झाल्या आहेत. आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात गुजरातहून नेते आले आहेत.
नवी मुंबईतील बेलापूर व ऐरोली मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांसाठी आलेले आमदार समरूपसिंग राजपूत व नागेश देवपल्ली यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या ‘पाहुण्यां’मुळे हॉटेल उद्योग मात्र तेजीत आहे.

“निवडणूक काळात भाजपची ही कार्यपद्धत आहे. ज्या राज्यात निवडणुका नसतात, तेथील कार्यकर्ते शेजारच्या राज्यात निवडणूक काळात प्रचारासाठी जातात. मात्र गुजरातमधून किती लोकप्रतिनिधी आले आहेत याचा निश्चित आकडा सांगता येणार नाही.”      
माधव भंडारी, भाजप प्रवक्ते

दिल्लीची बिल्ली!
महाराष्ट्राच्या सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला लोकसभेनंतर पोट निवडणुकांमध्ये सपशेल पराभव पत्करावा लागला, याची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांनी कल्याणच्या सभेत मोदींचे नाव न घेता दिल्लीची बिल्ली अशी खिल्ली उडवली.