विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘ऑक्टोबर हीट’बरोबरच राजकीय वातावरणही चांगलेच तापू लागले आहे. प्रत्येक पक्षाच्या प्रचारकांकडे, सभा गाजविणाऱ्यांकडे सर्वाचेच लक्ष आहे. याचाच  धांडोळा या स्तंभाद्वारे घेत आहोत. अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजपच्या स्टार प्रचारकांची फौज दांडगी असून त्यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरच ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री राजनाथसिंह, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, नितीन गडकरी, नवज्योतसिंग सिद्धू, स्मृती इराणी आदींचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधानांच्या पंक्तीत मानाचे स्थान पटकावलेल्या नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक काळात काही महिन्यांच्या काळात देशभरात अथकपणे फिरून घेतलेल्या जंगी सभा हा केवळ राष्ट्रीय नव्हे, तर जागतिक विक्रम ठरण्याचीही शक्यता आहे. जवळपास एकहाती प्रचारयंत्रणा राबवून प्रचाराचे वादळ निर्माण केले आणि प्रचंड बहुमताने सत्ता आणली, याची दखल अगदी जागतिक पातळीवरही घेण्यात आली. त्यामुळे ज्या अमेरिकेने त्यांना व्हिसा नाकारला, त्याच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्यासाठी लाल गालिचा अंथरला आणि शाही मेजवानीही दिली. तर तेथील भारतीयांचीही मने जिंकली. विलक्षण व्यक्तिमत्त्व, भुरळ टाकेल आणि अंत:करणाचा ठाव घेईल, असे वक्तृत्व व शैली यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपची सारी मदार मोदींवरच आहे. लोकसभा ज्याप्रमाणे मोदींच्या करिष्म्यावर जिंकली, त्याप्रमाणे विधानसभाही काबीज करण्याची भाजपची योजना आहे.
अमित शहा
लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशची धुरा समर्थपणे पेलल्याने राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडलेले अमित शहा हे मोदी यांचे जुने विश्वासू सहकारी. प्रसिद्धीमाध्यमांपासून चार हात दूर राहणे पसंत करीत कोणत्याही परिस्थितीत आपले लक्ष्य साध्य करण्यात शहा यांचा हातखंडा आहे. अगदी बारीकसारीक बाबींवर काटेकोर लक्ष देत आणि प्रत्येक मतदारसंघातील बदलत्या परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक उपाययोजना करीत निवडणूक प्रचार व्यवस्थापन करण्याचे शहा यांचे कौशल्य वादातीत आहे. शांत, संयमी, पण फटकून बोलणारे व्यक्तिमत्त्व असलेल्या शहा यांचा पक्षातील नेत्यांवर चांगलाच दराराही आहे. कामापेक्षा अन्य बाबींकडे ढुंकूनही न बघणारे शहा हे अध्यक्ष झाल्यावर देशात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने अपेक्षित कामगिरी केलेली नाही.
लालकृष्ण अडवाणी
भाजपच्या निर्णयप्रक्रियेपासून दूर गेलेले असले तरी वयोवृद्ध नेते लालकृष्ण अडवाणी हे पक्षात भीष्माचार्याप्रमाणे स्थान टिकवून आहेत. गेली वर्षांनुवष्रे देशभरात अखंडपणे फिरणारी त्यांची पावले आता थकली असली, तरी उत्साह व कार्यक्षमता ही तरुणांना लाजविणारी आहे. अटलबिहारी वाजपेयी हे उत्तम वक्ते म्हणून ओळखले गेले, तरी अडवाणीही जनमानसात आपले स्थान टिकवून आहेत. सध्या पक्ष नेतृत्वावर काहीसे नाराज असले तरी ती दाखविताना मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्याचे कसबही त्यांनी नुकतेच दाखविले आहे. शिवसेना-भाजप युती टिकविण्यामध्ये मोठे योगदान असलेल्या अडवाणी यांच्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही मोठा आदर आहे.
राजनाथसिंह
केंद्रीय गृहमंत्री व माजी राष्ट्रीय अध्यक्ष असलेले राजनाथसिंह यांचा राष्ट्रीय राजकारणातील अनुभव अतिशय दांडगा आहे. िहदी भाषेवर प्रभुत्व, कृषीसह अनेक विषयांवर चांगला अभ्यास असलेले राजनाथसिंह हे एक मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांचे वक्तृत्वही चांगले असून ते अध्यक्ष असताना ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विनंतीवरून त्यांनी मराठवाडय़ासह अन्य भागाला दुष्काळ व अन्य कारणांसाठी भेटी दिल्या होत्या. महाराष्ट्रातील राजकारण त्यांना चांगले माहीत असून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर भारतीयांचे प्रमाण मोठे असलेल्या विभागांमध्ये त्यांच्या सभांचे आयोजन केले जात आहे. अनेक केंद्रीय नेत्यांप्रमाणे राजनाथसिंहही राज्यातील प्रचारमोहिमेत उतरत आहेत.
नितीन गडकरी
नितीन गडकरी हे कायम चच्रेत किंवा वादात राहिलेले व्यक्तिमत्त्व. अगदी राज्यात प्रदेशाध्यक्षपदापासून ते केंद्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळही कायम चच्रेत राहिला. मनाला पटेल ते बिनधास्त बोलणारे आणि योग्य वाटेल, ते गतिमान पद्धतीने अमलात आणणारे ते धडाकेबाज नेते आहेत. आपल्या उक्ती किंवा कृतीचे परिणाम काय होतील, याची ते फारशी चिंता करीत नाहीत. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांचे कायमच शीतयुद्ध सुरू राहिले व ते राष्ट्रीय राजकारणात गेले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे संबंध तणावाचेच राहिले व त्यांची जवळीक राज ठाकरे यांच्याशीच राहिली.