लोकसभा निवडणुकीनंतर बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालांनंतर भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाऐवजी विकासाभिमुख राजकारण करण्याचा धडा घेतला आहे. लोकसभेत दणदणीत विजयानंतर ‘मोदी लाट’ अवघा देश व्यापेल, हा भ्रमाचा भोपळा फुटल्याने आता पक्षात चिंतन-मंथन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’वरून मतदारांनी भाजपला सपशेल नाकारल्याने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतीय जनता पक्षाला विकासाभिमुख राजकारणच करावे लागेल, असा धडा उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीतून मिळाल्याचे पक्षाच्या एका बडय़ा नेत्याने सांगितले.
उत्तर प्रदेशमध्ये अकरा जागांसाठी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला अवघ्या तीनच जागा मिळाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील रोहनिया तर केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या चरखारी विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार पराभूत झाला. याशिवाय राजस्थानमध्ये भाजपच्या वसुंधरा राजे मुख्यमंत्री असूनही तीन मतदारसंघ भाजपने गमावले. उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीत भाजपने मुसंडी मारल्यास २०१६ साली होणाऱ्या निवडणुकीत सप विरुद्ध भाजप असा सामना होऊन आपण रिंगणाबाहेर होऊ, अशी भीती बसपला होती. योगी आदित्यनाथ यांचा ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा भोवला, अशी कबुली भाजपच्या या बडय़ा नेत्याने दिली.