12 August 2020

News Flash

ठाण्यात सेना-भाजपमध्ये हाणामारी

राज्यातील सत्ता स्थापनेचा विश्वासदर्शक ठरावजिंकताच शिवसेना शाखेसमोर फटाके वाजवत थेट महापालिका मुख्यालयासमोर जल्लोष साजरा करणारे भाजप कार्यकर्ते व एकनाथ िशदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याने

| November 13, 2014 02:23 am

राज्यातील सत्ता स्थापनेचा विश्वासदर्शक ठरावजिंकताच शिवसेना शाखेसमोर फटाके वाजवत थेट महापालिका मुख्यालयासमोर जल्लोष साजरा करणारे भाजप कार्यकर्ते व एकनाथ िशदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याने महापौर संजय मोरे यांच्यासह आनंद साजरा करण्यासाठी जमलेले शिवसैनिक व नगरसेवक यांच्यात बुधवारी बाचाबाची झाली. घोषणाबाजीच्या कल्लोळात  भाजप कार्यकर्त्यांचा महापौरांना धक्का लागताच संतापलेल्या शिवसैनिकांनी त्यापैकी काहींना चोप दिला.
राज्यातील सत्ता समीकरणाच्या जुळवाजुळवीत शिवसेना-भाजपमध्ये निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात उमटताना दिसत आहेत. पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयासमोर उभारण्यात आलेल्या शुभेच्छा फलकावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्राला दोन दिवसांपूर्वी काळे फासण्यात आले होते. तेव्हापासून हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विश्वासदर्शक ठराव मंजूर होताच भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि जल्लोष साजरा करू लागले. यापैकी काहींनी तलावपाळी तसेच टेंभी नाक्यालगत असलेल्या शिवसेना शाखेपुढे फटाक्यांची भलीमोठी माळ लावली. यामुळे शिवसैनिकांमधून संताप व्यक्त होत होता.
एकनाथ िशदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचे वृत्त थडकताच महापौर संजय मोरे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक महापालिका मुख्यालयाभोवती जमले आणि एकमेकांना मिठाई भरवू लागले. इतक्यात या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची मिरवणूक येऊन पोहचली आणि त्यापैकी काहींनी घोषणाबाजी सुरू केली. याचदरम्यान दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते नाचत असताना भाजपच्या एका कार्यकर्त्यांचा महापौरांना धक्का लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांना चोप देण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून महापौरांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना पांगविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2014 2:23 am

Web Title: clash in sena bjp workers in thane
Next Stories
1 ‘गोंधळ माजविण्याचे नियोजन भाजपचे’
2 राज्यपालांना धक्काबुक्की केली नाही
3 सहा वेळा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने
Just Now!
X