मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जाणारे ऊर्जा, वित्त आणि जलसंपदा खात्यांचे राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना पश्चिम नागपूरमधून विधानसभेची उमेदवारी देण्यास राज्य काँग्रेसच्या संसदीय मंडळात शनिवारी विरोध झाला. विधान परिषदेचे आमदार असलेल्या मुळक यांना निवडणूक लढवायचीच असल्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढविण्यास भाग पाडावे, अशी मागणी झाली.
विदर्भ आणि मराठवाडय़ातील उमेदवारांच्या नावांची शिफारस संसदीय मंडळाच्या बैठकीत करण्यात आली. विद्यमान मंत्री आणि आमदारांच्या नावांची छाननी समितीला शिफारस करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. नागपूर शहरातून राज्यमंत्री मुळक यांच्या नावाचा प्रस्ताव आला असता माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी त्याला विरोध केला.
नागपूर पश्चिम मतदारसंघातून मुळक यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव होता. विरोधामुळे या मतदारसंघातून शहर काँग्रेस अध्यक्ष विलास ठाकरे यांच्या नावाची छाननी समितीला शिफारस करण्यात आली. अर्थात, मुख्यमंत्र्यांनी अधिकाराचा वापर केल्यास मुळक यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. माजी राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चिमूरऐवजी ब्रम्हपुरीतून उमेदवारी मागितली आहे. त्याला नारायण राणे यांनी विरोध केल्याचे समजते. वडेट्टीवार हे राणे यांच्याबरोबरीने काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. पुढे उभयतांमध्ये बिनसले आणि राणे यांनी त्यांना मतदारसंघ बदलून देण्यास विरोध केला.
आमदारांबाबत उद्या चर्चा
विद्यमान आमदारांच्या उमेदवाराची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी काही आमदारांच्या उमेदवारीस विरोध झाला आहे. यामुळेच उद्या विद्यमान आमदारांच्या फेर उमेदवारीबाबत चर्चा केली जाईल. दोन-चार अपवाद वगळता सर्व आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल, असे संकेत देण्यात आले.
११४ मतदारसंघांतील इच्छुकांच्या आज मुलाखती
राष्ट्रवादीने सर्व २८८ मतदारसंघांतील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने राष्ट्रवादीच्या ताब्यातील ११४ मतदारसंघांतील इच्छुकांच्या उद्या मुलाखती आयोजित केल्या आहेत. उद्या दिवसभर या मुलाखती घेतल्या जातील. सोमवारी लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समितीची बैठक मुंबईत होईल. त्यात एकाच नावाची शिफारस झालेल्या मतदारसंघाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सोमवारी प्रचाराची सुरुवात
पक्षाच्या प्रचाराची सुरुवात सोमवारी सकाळी ११ वाजता हुतात्मा चौकातून होणार आहे. या वेळी ज्योत प्रज्वलित केली जाईल. आझाद मैदानात होणाऱ्या समारंभात पक्षाच्या ५४ संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये प्रचार ज्योती पाठविल्या जातील. प्रचाराची सारी धुरा नारायण राणे यांच्याकडे आहे.