मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या तिढय़ामुळेच भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटली असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
युतीमध्ये भाजप, तर आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हे अनुक्रमे शिवसेना आणि काँग्रेसच्या वर्चस्वामुळे अस्वस्थ होते, ही वस्तुस्थिती असल्याने या घडामोडी अनपेक्षित नव्हत्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पृथ्वीराज चव्हाण यांना चार वर्षांपूर्वी आणण्यात आले तो एक प्रयोग होता. आपल्या अनुभवाच्या जोरावर ते पक्षाला वेगळी झळाळी देतील, अशी त्या वेळी अटकळ बांधण्यात आली होती, असे काँग्रेसच्या नेत्याने सांगितले.
मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यशैलीमुळे स्वपक्षीयच दुखावले गेले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेही दुखावले गेले, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातच मतभेद असतील आणि ते एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या पवित्र्यात असतील, तर सरकारचा कारभार कसा चालणार, असा सवाल काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला.शिवसेना एनडीएप्रमाणे कृती करीत नसल्याने युतीमधील संबंध अनेक वर्षांपासून ताणले गेले होते.