गेली १५ वर्षे सत्तेत असताना विविध प्रश्न रेंगाळत ठेवणाऱ्या करणाऱ्या काँग्रेसला, राज्यात भाजपचे सरकार येताच या प्रश्नांची आठवण झाली आहे. टोल, एलबीटी, कापूस खरेदीसह विविध प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करीत भाजप सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेण्याचे काँग्रेसने आज जाहीर केले.
टोल आणि एलबीटीबाबत देवेंद्र फडणवीस सरकारची भूमिका जनतेला समजली पाहिजे. कापूस आणि सोयाबीनची खरेदी त्वरित सुरू करावी. राज्यात दलितांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. या पाश्र्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेबाबत खंबीर भूमिका घ्यावी. अवेळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी. राज्यात डय़ेंगूच्या पेशंटमध्ये वाढ होत आहे. अशा वेळी या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता उपाय योजण्यात यावेत, अशा विविध मागण्या काँग्रेसच्या वतीने सरकारकडे करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या कृषीपंपासाठी काँग्रेस सरकारने वीज बिलात सवलत दिली होती. यासह शेतकरी व समाजातील विविध वर्गांच्या कल्याणाचे निर्णय घेतले होते. सर्वसामान्य किंवा शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय नवे सरकार रद्द करणार का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. आघाडी सरकारच्या काळातील कोणते निर्णय रद्द करणार याची यादी जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मराठा वा मुस्लिम या आरक्षणाच्या निर्णयाला धक्का लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे यांनी दिला.