विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी निरोप देणे.. कार्यालयाची साफसूफ करून बैठकीची तयारी करणे.. विविध मतदारसंघांत निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेमध्ये कोण कोण कुठे आहे याची माहिती ठेवणे.. कार्यालयात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची विचारपूस.. प्रचार पत्रके पोहोचली की नाही याची माहिती ठेवणे.. प्रसारमाध्यमांना बातम्या पोहोचविणे अशी किती तरी कामे सागर शेंडे हा काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता गेली अनेक वर्षे आनंदाने करीत असतो.
शहर काँग्रेसचे कार्यालय देवडिया भवन आणि या भवनात गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेला सागर शेंडे १९८८ मध्ये देवडिया भवनशी कृष्णा चौधरी यांच्या माध्यमातून जुळला गेला तो आजतागायत त्या कार्यालयात अविरत सेवा करीत असून देवडिया भवन आता त्याचे निवासस्थान झाले आहे. आतापर्यंत ८८ नंतरच्या महापालिका, जिल्हा परिषद, पदवीधर, विधान परिषद, विधानसभा, लोकसभा आणि पक्ष पातळीवर अनेक निवडणुका सागरने अनुभवल्या असून प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी निष्ठेने कामे पदाधिकारी सांगेल ते काम केले आहे. बैठकीचे पदाधिकाऱ्यांना निमंत्रण, कार्यालयाची साफसफाई असो, की निवडणुकीच्या काळात प्रचार यंत्रणेची जबाबदारी असो, सांगितलेले काम केले नाही असे क्वचितच सागरबाबत घडले असल्यामुळे देवडिया भवनात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांला आणि पदाधिकाऱ्याला आपला वाटतो. देवडिया भवनात पक्षातील राष्ट्रीय नेते किंवा कोणी राज्य पातळीवरील पदाधिकारी, मंत्री येत असेल, तर त्यांच्या आगमनापूर्वीची तयारी करून ठेवली की, तो कुठेही समोर समोर करीत नाही.
कार्यालयात एखादी गोष्ट दिसत नसेल, तर सागरशिवाय ती दिसत नाही, त्यामुळे सदैव तो कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या सेवेत असतो. या वेळी आतापर्यंत सागरने सहा शहर अध्यक्षांच्या हाताखाली काम केले आहे. विविध राजकीय पक्ष हायटेक झाली आहेत.
मोबाइलसारखी साधने आली असली तरी बैठकीचे निमंत्रण असो, एखादी वस्तू पदाधिकाऱ्यांच्या घरी नेऊन द्यायची असो, सागर त्यांच्या निवासस्थानी जात असतो. देवडिया भवनातील अनेक कडू-गोड अनुभव त्याने अनुभवले असल्यामुळे प्रत्येक नेत्याची आणि कार्यकर्त्यांची त्याला पारख आहे. सागरने पक्षश्रेष्ठीसमोर कधीही पद मागितले नाही, ना निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली.   पक्षाकडून जे काही थोडेफार मानधन दिले जाते, ते कधी तरी वाढावे असे वाटत असताना त्याबाबत कधी पदाधिकाऱ्यांसमोर बोलत नाही. देवडिया भवनमध्ये पक्षाशी संबंधित बाहेरगावावरून अनेक कार्यकर्ते येत असतात. त्यातील अनेकांची भोजनाची व्यवस्था नसते, त्यामुळे सागर कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये किंवा स्वत:च्या घरी जेवणास करायला घेऊन जात असतो. काँग्रेसमध्ये पूर्वी कार्यकर्त्यांची चहलपहल असायची. आता मात्र पक्षातील विविध नेत्यांची स्वतंत्र प्रचार कार्यालये झाल्यामुळे देवडिया भवनात कार्यकर्त्यांचा वावर कमी झाला आहे. मात्र बैठक असो किंवा एखादा कार्यक्रम असला की गर्दी असते. चौथीनंतर शिक्षण घेण्याची परिस्थिती नसल्यामुळे पाचवी ते दहावीपर्यंतचे त्याचे शिक्षण माजी खासदार गेव्ह आवाही आणि मारोतराव कुंभलकर यांनी केले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे सागरचे आवडते नेते. एका निवडणुकीमध्ये मौदाला विलासरावांची सभा होता. तेव्हा ते सागरला सोबत घेऊन गेले होते, ही आठवण म्हणजे सागरसाठी ‘मर्मबंधातली ठेवच’. कोणत्याही पदाची लालसा न ठेवता केवळ एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याचं सागरचे स्वप्न आहे.