देशात महागाई वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये ढोल वाजवतात. सत्तेत येण्यासाठी मोदींनी निवडणूक प्रचारात मोठमोठाली आश्वासने दिली. पण आता त्यांना आश्वासनांचा विसर पडला असल्याची जोरदार टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. त्यावर, राहुल यांना स्वपक्षात कुणी गांभीर्याने ऐकत नाही; आम्ही त्यांचे कशाला ऐकू, अशी खोचक प्रतिक्रिया केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री वेंकय्या नायडू यांनी दिली. काँग्रेसमध्ये टीम राहुल विरुद्ध ज्येष्ठ नेते अशी सुंदोपसुंदी सुरू आहे. त्या पाश्र्वभूमीवर नायडू यांनी राहुल यांच्या विरोधातील हवा काढून टाकली.
मोदींनी जपानमध्ये ढोल वाजवला; पण इकडे काँग्रेसचा सूर बिघडला, अशी उपरोधिक टीका भाजप प्रवक्ते नलीन कोहली यांनी केली. उत्तर प्रदेशमध्ये वीज संकट निर्माण झाले आहे. त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री यादव यांनी ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्याशी किती वेळा राज्याच्या वीजप्रश्नी चर्चा केली? याचा शोध घेतल्यास राहुल गांधी यांना त्यांचे उत्तर मिळेल. जे स्वत: संपुआ सरकारच्या काळात संसदेत झोपून होते; त्यांनी देशाच्या समस्येवर बोलावे, हे आश्चर्यकारक आहे, असे कोहली म्हणाले.