विधानसभेच्या लागोपाठ तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळवून देणाऱ्या मुंबईत काँग्रेसने यंदा शक्तिप्रदर्शन करण्याचे टाळले आहे. यातूनच पक्षाध्यक्षा सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्या सभांचे आयोजनही करण्यात आलेले नाही.
लोकसभा आणि विधानसभेच्या २००४ आणि २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या प्रचारार्थ पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. सोनियांच्या मोठय़ा सभा आयोजित करून पक्षाने मुंबईत शक्तिप्रदर्शन करीत वातावरणनिर्मिती केली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता वांद्रे-कुर्ला संकुलात सोनिया गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सोनियांची तब्येत बिघडल्याने ऐनवेळी राहुल हे खास मुंबईत आले होते. मुंबईत झालेली ती सभा नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तोडीस तोड होती. पक्षाने तेव्हा मुंबईत शक्तिप्रदर्शन केले होते.
१९९९ मध्ये मुंबईत काँग्रेसचे १२ आमदार निवडून आले होते. तेव्हा मुंबईने हात दिल्यानेच राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता येण्याचा मार्ग सुकर झाला होता. २००४ आणि २००९च्या निवडणुकांमध्ये मुंबईत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत पार धुव्वा उडाल्यापासून राज्य आणि मुंबई काँग्रेसचे नेते पार हादरले आहेत. गेल्या वेळी मुंबईत काँग्रेसचे सर्वाधिक १७ आमदार निवडून आले होते. यंदा पक्षाच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांची सभा आयोजित केल्यास गर्दी जमविण्यापासून सभा यशस्वी होण्याकरिता सारी शक्ती लावावी लागते. यातूनच उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा वेळ जातो. यामुळेच मुंबईत सभा आयोजित करण्याचे टाळण्यात आले, असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले. वेळ कमी असल्यानेच सभांसाठी वेळ मिळू शकला नाही, असे मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी स्पष्ट केले.
मुंबईत यंदा काँग्रेसला तेवढे सोपे नाही. यावेळी आठ ते दहा उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इ. स. २००० पर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण, झोपडय़ा हस्तांतरित करण्यास परवानगी, शहरात केलेली विविध विकास कामे यावर काँग्रेसने प्रचारात भर दिला आहे.