लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी इतर पक्षांतून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्यांना महत्त्वाची जबाबदारी दिल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. वर्षांनुवर्षे पक्षात राहणाऱ्यांना डावलून राहुल गांधी यांनी मोहन प्रकाश, मधुसूदन मिस्त्री, मोहन गोपाल या इतर पक्षांमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीतील पराभवाची समीक्षा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ए. के. अ‍ॅन्टोनी समितीच्या अहवालात उमेदवारीवाटपात झालेल्या गोंधळास राहुल गांधींच्या या निकटवर्तीय नेत्यांना जबाबदार धरले होते. राहुल गांधी याच नेत्यांवर कार्यकर्ता बांधणीसाठी (केडर) मोठी जबाबदारी सोपवणार आहेत. कार्यकर्ता प्रशिक्षणाची योजना राहुल गांधी यांनी आखली आहे.
काँग्रेसला राम-राम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास डगमगू लागला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी राहुल गांधी स्वत:च्या गटामार्फत नवा कार्यक्रम पक्षाला देणार आहे. ज्यात कार्यकर्त्यांशी संवाद-संपर्क साधण्यात येईल. कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी मोहन गोपाल यांच्यावर देण्यात येणार आहे. मोहन गोपाल यांनी युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले होते. त्याच धर्तीवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. मूळचे समाजवादी असलेल्या मोहन प्रकाश यांच्यावरही राहुल गांधी यांची विशेष मर्जी आहे. महाराष्ट्रातून अवघ्या दोनच जागी काँग्रेसला यश आले. त्यामुळे मोहन प्रकाश यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना आनंद झाला होता. परंतु मोहन प्रकाश यांचे महत्त्व कायम राहिले. याशिवाय कामगार चळवळ, शंकरसिंह वाघेला यांची राष्ट्रीय जनता पक्षामार्गे काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या मिस्त्री यांना उत्तर प्रदेशमध्येच ठाण मांडून बसण्याचे आदेश राहुल गांधी यांनी दिले आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत भाजप लाट आली असली तरी, विधानभा निवडणुकीत सप-बसपपेक्षा जास्त जागाजिंकून विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याची जबाबदारी राहुल गांधी यांनी मिस्त्रींकडे सोपवली.
जास्तीत जास्त युवकांपर्यंत काँग्रेस विचार पोहचवण्याची जबाबदारी राहुल गांधी यांनी राजीव गौडा यांना दिली आहे. आयआयएममध्ये प्राध्यापक असलेले राजीव गौडा लोकसभा निवडणुकीत दक्षिण बंगळूरमधून इच्छुक होते. परंतु नंदन निलकेणी यांच्यासाठी त्यांनी माघार घेतली. माजी विदेशमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या जागी गौडा यांना राज्यसभा सदस्यत्व देण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला होता.