स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर भाजपने हवा तापविण्यास सुरुवात केल्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली असून, विदर्भातील तरुणांना शासकीय नोकऱ्यांमध्ये स्वतंत्र आरक्षण तसेच विदर्भासाठी वेगळा लोकसेवा आयोग स्थापन करण्याची भूमिका पक्षाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करावी, अशी मागणी पक्षाचे मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.
पक्षाच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख सुशीलकुमार शिंदे यांना मागण्यांचे पत्र डॉ. राऊत यांनी सादर केले.
विदर्भासाठी पक्षाच्या जाहीरनाम्यात विशेष भर द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. घटनेच्या कलम ३७१ (२) नुसार नोकऱ्यांमध्ये विदर्भातील तरुण-तरुणींना आरक्षण देणे शक्य असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत विदर्भाची लोकसंख्या २४ टक्के असताना विदर्भातील तरुण-तरुणींचे शासकीय नोकऱ्यांमधील प्रमाण हे केवळ नऊ टक्के असल्याची ताजी आकडेवारी समोर आली आहे. विदर्भासाठी स्वतंत्र लोकसेवा आयोग स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसचा पार सफाया झाला. सर्व दहा जागा भाजप-शिवसेनेने जिंकल्या होत्या. विदर्भात विधानसभेच्या ६२ जागा असून, काँग्रेससाठी या जागा महत्त्वाच्या आहेत. विदर्भातील विरोधात गेलेले जनमत फिरविण्याच्या उद्देशानेच विदर्भातील काही उत्साही काँग्रेस नेत्यांनी नव्या कुरापती सुरू केल्याचे मानले जाते.