राहुल गांधी यांच्यावर लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाचे खापर फोडण्यात येत असताना काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांच्या पाठीशी उभा होता. पण जनार्दन द्विवेदी, दिग्विजय सिंग यांनी विरोधी सूर आवळल्यानंतर तेच सूर सर्वत्र उमटू लागले आहेत. राहुल यांनी मंत्रिपद भूषवायला पाहिजे होते, असे सांगत मुख्यमंत्री चव्हाण यांनीही भूमिका बदलल्याचे मानले जाते.
कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे, असा सल्ला पक्षाचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांनी दिला होता. राहुल गांधी यांनी मौन सोडावे, असे मत दिग्विजय सिंग यांनी व्यक्त केले. दिग्विजय सिंग हे राहुल यांचे निकटवर्तीय मानले जात. पण मुलाखतीत सिंग यांनी राहुल यांच्याबद्दल केलेली मते ही पक्षासाठी त्रासदायक ठरू शकतात. यामुळेच पक्षाने सिंग यांच्या भूमिकेशी समहत नसल्याचे स्पष्ट केले. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही तशीच भूमिका मांडल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले. निवडणुकीतील पराभवानंतर राज्यात नेतृत्व बदलासाठी राहुल यांच्या निकटवर्तीयाने पुढाकार घेतला होता, असेही म्हटले जाते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेली लोकसभा निवडणूक, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या विधानसभा निवडणुका यामध्ये यश दूर राहोच पण पक्षाची उलट पीछेहाटच झाली. राहुल यांचे नेतृत्व यशस्वी ठरत नसल्याने प्रियंका गांधी यांनी पुढे यावे, अशी मागणी पक्षातून होऊ लागली. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या प्रियंकाला पुढे येऊ देणार नाहीत. तसेच प्रियंका गांधी यांनी नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला तरी भाजप सरकार रॉबर्ट वडेरा यांचे जमीन घोटाळे चव्हाटय़ावर आणून काँग्रेसला अडचणीत आणू शकते.