सरकारच्या विरोधातील नाराजीचा फटका बसू नये म्हणून विद्यमान सदस्यांना घरी बसवून नवे चेहरे देण्याचा प्रयोग यापूर्वी काही ठिकाणी करण्यात आला असला तरी राज्यात काँग्रेसने विद्यमान मंत्री आणि आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याची शिफारस पक्षाच्या राज्य संसदीय मंडळाने दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना केली आहे.
पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची छाननी समितीला शिफारस करण्याकरिता राज्य काँग्रेस संसदीय मंडळाची बैठक बुधवारी पार पडली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेते याप्रसंगी उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातील संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा करण्यात आली. डॉ. पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, पद्माकर वळवी या मंत्र्यांसह सर्व विद्यमान आमदारांच्या नावांची शिफारस पक्षाच्या केंद्रीय छाननी समितीला करण्यात आली. शनिवारी विदर्भ, मराठवाडा, मुंबई आणि कोकणातील नावांबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
विद्यमान सर्व आमदारांच्या नावांची शिफारस केंद्रीय छाननी समितीला करावी, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. पक्षाचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती राज्य संसदीय समितीकडून पाठविण्यात आलेल्या नावांची शिफारस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या केंद्रीय निवडणूक समितीला करेल. उमेदवारांची अंतिम यादी ही नवी दिल्लीतूनच निश्चित केली जाईल.
पक्षाच्या विरोधात नाराजी असल्याने काही विद्यमान आमदारांना उमेदवारी देऊ नये, असा पक्षात मतप्रवाह होता. मध्यतंरी पक्षाच्या काही निवडक नेत्यांच्या झालेल्या बैठकीत विद्यमान ८२ पैकी २० पेक्षा जास्त आमदारांना घरी बसवावे, अशी चर्चा झाली होती. पण आताच तसा निर्णय घेतल्यास पक्षात नाराजी आणि बंडखोरी वाढेल, अशी भीती असल्याने सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याची शिफारस करण्यात आली. दिल्लीच्या पातळीवर काही चेहरे बदलले जाऊ शकतात, असे सूचित करण्यात आले.
भुजबळ पुत्राला आव्हान
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र व नांदगावचे विद्यमान आमदार पंकज भुजबळ यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. गजानन देसाई यांनी उमेदवारी मागितली आहे. पंकज भुजबळ आणि डॉ. देसाई या दोघांनीही आज मुलाखती दिल्या. उमेदवारीसाठी डॉ. देसाई यांनी पक्ष कार्यालयात मध्यंतरी शक्तीप्रदर्शन केले होते. राष्ट्रवादीच्या मुलाखतींचा कार्यक्रम पूर्ण झाला.