विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता काँग्रेस पक्षात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात सूर उमटू लागले असून, विधिमंडळ पक्षनेतेपदी नव्या चेहऱ्याची निवड करण्यात यावी, अशी भूमिका विदर्भातील आमदारांनी घेतली आहे.
आधी लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. या दोन्ही निवडणुका पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्या. काँग्रेसचे ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदी पक्षाने नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, असे मत आज ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. पृथ्वीराज चव्हाण यांना व्यक्तिश: माझा विरोध नाही, पण झालेल्या दोन्ही निवडणुकीत राज्यातील जनतेने पक्षाच्या राज्यातील नेतृत्वाला साफ नाकारले आहे. हे वास्तव पक्षश्रेष्ठींनी लक्षात घेऊन नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, असे ते म्हणाले.
विदर्भात काँग्रेसचे ११ आमदार आहेत. यातील बव्हंशी आमदारांची हीच भावना आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी आज केला. भाजपने मुख्यमंत्रिपदी नवा व तरुण चेहरा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर जबाबदार विरोधकाची भूमिका पार पाडतानाच जनतेचा पुन्हा विश्वास संपादन करायचा असेल तर नव्या दमाच्या व्यक्तीकडे विधिमंडळाचे नेतेपद देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. विदर्भातील काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी निकाल लागल्यानंतर चव्हाण यांच्यावर टीका केली होती.