महाराष्ट्राची जनता लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील काँग्रेसच्या भ्रष्टाचारी नेत्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला १० जागा देखील जिंकता येणार नाहीत असा ठाम विश्वास पंतप्रधान मोदींनी मंगळवारी खामगावमधील जाहीर सभेत व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी महाराष्ट्रात घेतलेल्या भाजपच्या प्रचार सभांना जेवढी गर्दी जमली होती त्याहून अधिक गर्दी आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांना होत असल्याचे म्हणत रखरखत्या उन्हात होणारी ही अलोट गर्दी म्हणजे राज्यात भाजपचेच सरकार येण्याचे संकेत आहेत, असेही मोदी म्हणाले.
ज्यांच्या घड्याळाचे काटे एक तसूभरही पुढे सरकू शकलेले नाहीत, ते राज्याचा विकास काय करणार? असा खोचक सवाल उपस्थित करत मोदींनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
खामगाव विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार आकाश फुंडेकर यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रचारसभेत मोदींनी नेहमीप्रमाणे मराठीतूनच सुरूवात केली. दरम्यान, खामगाव हा जिल्हा होणार होता त्याचे काय झाले? येथे रेल्वेही येणार होती आली का? अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले पण तुम्हाला दिलेले आश्वासने पूर्ण झाली का? असे सवाल उपस्थित करत मोदींनी तेथील स्थानिक समस्यांवरून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.