कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून मंगळवारी सकाळी झालेली बैठक कोणत्याही तोडग्याशिवाय संपुष्टात आली. दोन्ही पक्षांचे नेते पुन्हा एकदा मंगळवारी रात्री मुंबईमध्ये भेटणार असून, त्यावेळी जागावाटपावर पुन्हा चर्चा होणार असल्याचे कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे कॉंग्रेसकडून या बैठकीला उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. सुमारे ४५ मिनिटे या सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, सर्वच नेत्यांना पूर्वनियोजित कार्यक्रमांनुसार वेगवेगळ्या ठिकाणी जायचे होते. त्याचबरोबर राष्ट्रवादीने ठेवलेल्या प्रस्तावावर कॉंग्रेस नेत्यांना दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी बोलायचे असल्यामुळे सर्वच नेत्यांनी रात्री पुन्हा एकदा भेटण्याचे निश्चित केले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नसल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या दुप्पट जागा मिळाल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीत १४४ जागा देण्याची मागणी कॉंग्रेसकडे केली आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत इतक्या जागा वाढवून देण्यास कॉंग्रेस तयार नाही. याच मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमधील जागावाटपाची चर्चा अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेली नाही.