महाराष्ट्रात पंधरा तर केंद्रात गेल्या दहा वर्षांपासून सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने साथ सोडल्यानंतर विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष परस्परांविरोधात उभे ठाकले आहेत. पारंपारिक प्रतिस्पर्धी शिवसेना व भाजपवर टिका करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचाही समाचार घेण्याची योजना काँग्रेसने आखली आहे. परंतु, राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्याविरोधात टीका न करण्याची सूचना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील नेत्यांना केली आहे. अर्थात अजित पवार, सुनिल तटकरे व छगन भुजबळ यांच्याविरोधात शक्य तितका प्रचार करा, असे स्पष्ट निर्देश हायकमांडने दिले आहेत.
आघाडी संपल्याची घोषणा करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली होती. आघाडीसंदर्भात जागावाटपावर चर्चा करण्यास चव्हाण उत्सूक नव्हते, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. चव्हाण यांनीदेखील लगेचच पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीच्या आरोपांना प्रत्यूत्तर दिले. शनिवारी उमेदवारी अर्जा दाखल झाल्यानंतर पुढील पंधरा दिवस प्रचाराच्या तोफा अहोरात्र धडाडणार आहेत.
प्रचारादरम्यान भाजप, सेनेचा खरपूस समाचार घेवून काँग्रेस पक्ष धर्माधतेच्या मुद्यावर मत मागणार आहे.  राष्ट्रवादीविरोधात बोलण्याची वेळ आलीच तर शरद पवार यांच्याविरोधात बोलण्याचे काँग्रेस नेते टाळतील. त्याऐवजी राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना ‘टार्गेट’ केले जाईल. शरद पवार वयाने ज्येष्ठ आहेत. शिवाय पवार यांच्यावर वैयक्तीक टीका केल्यास त्याचा विपरित परिणाम मराठा मतांवर होण्याची काँग्रेस नेत्यांना भीती
आहे.  राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी अजित पवार यांनी ‘पाणीटंचाइ’ दूर करण्यासाठी सुचवलेल्या उपायांची आठवण करून देण्यात येईल, असे काँग्रेसच्या दिल्लीस्थित ज्येष्ठ नेत्याने सांगितले.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विरोधात वक्तव्ये केली, तरच प्रत्यूत्तर देण्यास सांगितले आहे.