विविध घोटाळ्यांच्या आरोपांमुळे काँग्रेसला केंद्रातील सत्ता गमवावी लागली. यामुळेच बहुधा काँग्रेसने महाराष्ट्रातील प्रचारात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वच्छ प्रतिमेवर भर दिला आहे. राज्याचे नेतृत्व करण्याकरिता पृथ्वीराजबाबांसारख्या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याची गरज आहे, असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसलाच सत्ता देण्याचे आवाहन लातूर जिल्ह्यातील औसा येथे बुधवारी केले.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांच्यावर पक्षातूनच टीका होऊ लागली होती. परिणामी गेले चार महिने सक्रिय राजकारणापासून काहीसे अलिप्त राहिलेल्या राहुल यांनी राज्याच्या दौऱ्यात काहीशी आक्रमक भूमिका घेतली होती. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना चांगल्या कामाबद्दल प्रशस्तीपत्र दिले. मुख्यमंत्रीपदी असताना चव्हाण हे निर्णय घेत नव्हते, अशी टीका मित्र पक्षाबरोबरच स्वपक्षीय नेतेही करीत. पृथ्वीराजबाबांनी चांगले काम केले. फक्त गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांप्रमाणे त्यांना केलेल्या कामाचे मार्केटिंग करता आले नाही. जनतेच्या फायद्याचे अनेक निर्णय त्यांनी घेतले, असे गौरवोद्गार राहुल गांधी यांनी काढले.
सरकारच्या विरोधातील नाराजीचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसने आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वच्छ प्रतिमेला प्रचारात प्राधान्य दिले आहे. राहुल गांधी यांनी तीनदा पृथ्वीराज चव्हाण यांचे कौतुक करताना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेच्या आधारे पुन्हा निवडून द्या, अशी भूमिका मांडली.
राज्यपालांचे छायाचित्र अन् दिलीपरावांची दांडी
सभास्थळी काँग्रेसच्या सर्व नेत्यांची छायाचित्रे लावण्यात आली होती. त्यात लातूरचे माजी खासदार सध्या पंजाबचे राज्यपाल असलेल्या शिवराज पाटील यांचेही मोठे छायाचित्र होते. राज्यपालांचे छायाचित्र हे ठराविक समाजाला खुश करण्याकरिता लावण्यात आल्याची चर्चा होती. काँग्रेसचे जिल्ह्यातील सारे नेते उपस्थित असताना विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीप देशमुख यांनी अनुपस्थिती जाणवत होती.
राष्ट्रवादीला टाळले, मोदी लक्ष्य
राज्यात आघाडी तुटण्यास राहुल गांधी यांचे नेतृत्व जबाबदार असल्याचे खापर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी फोडले आहे. नव्या नेतृत्वाला समविचारी पक्ष संपवायचे आहेत, असे विधानही पवार यांनी केले होते. पण राज्याच्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचा उल्लेख किंवा नेतृत्वावर टीका करण्याचे टाळले. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तरही दिले नाही. नरेंद्र मोदी यांच्यावर मात्र राहुल यांनी तोफ डागली. पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी काही औषधांच्या किंमतींवरील नियंत्रण सरकारने उठविले. यामुळे कर्करोगावरील उपचारासाठी आठ हजार रुपयांमध्ये मिळणाऱ्या औषधांची किंमत आता लाखांच्या घरात जाणार आहे. मोदी सरकार हे काही उद्योगपती वा कंपन्यांच्याच फायद्याचे निर्णय घेत असल्याचा आरोपही राहुल यांनी केला.