नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करणारे विरोधक महाराष्ट्रात मात्र, मुख्यमंत्री म्हणून कोणालाही ‘प्रोजेक्ट’ करूच शकत नसल्याचा टोला लगावताना, येत्या दोन दिवसात आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय होईल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
‘काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीने सन्मानाने एकत्र राहून जातीयवादी पक्षांना सामोरे जावे अशी आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे. त्यानुसार आघाडी कायम राहून मुंबईत जागा वाटपासाठी महत्त्वाची बैठक होत आहे. त्यात जागा वाटपाचे धोरण निश्चित होऊन त्यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीची बैठक होईल आणि उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल. लोकसभा निवडणुकीप्रमाणे सामंजस्याने काही मतदारसंघाची अदला बदल होऊ शकते, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील आघाडी शासनाचे महत्त्वपूर्ण निर्णय आणि केंद्रातील नव्या सरकारची निराशाजनक कामगिरी यासह अन्य मुद्यांवर निवडणूक प्रचारात आपला भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. दरडोई उत्पन्नाचा विचार करता, महाराष्ट्र हरयाणानंतर दुसऱ्या क्रमांकावरील राज्य असून, गुजरात कुठे आहे, हे गडकरींनी सांगावे. रोजगारासह अनेक क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. गडकरी काही म्हणाले असले तरी आकडे खरे बोलतात. गडकरींना गुजरातचे कौतुक करावयाचे असेल तर ते त्यांनी जरूर करावे पण, त्यासाठी कोणीही महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा चव्हाण यांनी दिला.