पंधरा वष्रे महाराष्ट्राला लुबाडणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला गाडून टाकण्यासाठीच १५ ऑक्टोबरचा मुहूर्त चालून आला आहे. राज्याला लुबाडणाऱ्यांच्या साथीदारांनाही त्यांची जागा दाखवून द्या आणि महाराष्ट्रात भाजपला पूर्ण बहुमत द्या असे आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुल्लेखाने शिवसेनेचाही शालजोडीतून समाचार घेतला.
पश्चिम उपनगरातील उत्तर मुंबईच्या सहा विधानसभा मतदारसंघांतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी बोरीवली येथील प्रस्तावित बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलाच्या मदानावर मोदी यांची मुंबईतील अखेरची प्रचार सभा झाली. अभूतपूर्व उत्साहाने ओसंडणारया विराट जनसमुदायासमोर बोलताना मोदी यांनी पुन्हा मुंबईच्या विकास मंत्राचा जप केला, तेव्हा विराट गर्दीनेही मोदी यांच्या सुरात सूर मिसळले होते. संध्याकाळपासूनच मोदीमय झालेल्या मदानावर सहा वाजता सभा सुरू झाली आणि उत्साहाचे उधाणही सुरू झाले. संपूर्ण मदान गर्दीने ओसंडून गेल्यावर बाहेरील चहुबाजूंचे रस्तेही गर्दीने फुलून गेले होते. रात्री सव्वाआठच्या सुमारास मोदी यांचे सभास्थानी आगमन झाल्यावर गर्दी अक्षरश: बेभान होऊन मोदीनामाचा गजर करू लागली.
तोवर सभेचा किल्ला बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार विनोद तावडे, उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, व अन्य उमेदवारांनी लढविला. आपल्या भाषणात तावडे यांनी शिवसेनेवर थेट हल्ला चढविला. मराठी आणि गुजराती समाज दूध-साखरेसारखा एकजीव झालेला असताना मिठाचा खडा टाकून सौहार्द नासवू नका, असा इशारा तावडे यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या राजवटीवर कोरडे ओढतानाच, शिवसेनेचा थेट उल्लेख टाळला, पण, मुंबईची लूट करणाऱ्यांना घरातच बसवा असे आवाहन केले, तेव्हा गर्दीतून शिवसेनाविरोधाचे हलके सूर सभेत उमटले.
गेल्या पंधरा वर्षांच्या काँग्रेस -राष्ट्रवादीच्या राजवटीने महाराष्ट्राचे केवळ पंधरा वर्षांचे नुकसान केलेले नाही, तर राज्याच्या दोन पिढय़ा बरबाद केल्या आहेत. भ्रष्टाचाराबरोबरच भाईगिरीही बोकाळली आहे. आता भारताच्या दाराशी विकासाच्या संधी उभ्या ठाकल्या आहेत, त्याची फळे महाराष्ट्रालाही मिळणार असल्याने भाजपला बहुमत द्या, असे आवाहन मोदींनी केले. मुंबई हा देशाचा कणा आहे. मुंबई थांबली तर देश थांबेल. अशा वेळी, आपल्या एका बोटात असलेली परिवर्तनाची शक्ती वाया घालवू नका, असे आवाहनही मोदी यांनी केले.
एकहाती सत्ता द्या
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन वेगळे पक्ष भासत असले तरी या दोन्ही पक्षांचे गोत्र मात्र समान आहे. सत्तेसाठी हे पक्ष पुढे एकत्र आले आणि आता सत्तेचे जहाज बुडते आहे हे पाहून पुन्हा वेगळे झाले. महाराष्ट्राला मागील १५ वर्षांत या दोन्ही पक्षांनी बरबाद केले असून महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमत द्या, असे आवाहन मोदी यांनी रविवारी ठाण्यातील प्रचारसभेत केले.
‘नॅचरल करप्ट पार्टी
उस्मानाबाद/नांदेड : एनसीपी या इंग्रजी शब्दांचा विस्तार ‘नॅचरल करप्ट पार्टी’ असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर तुळजापूर येथे हल्ला चढवला. तर लोहा येथील सभेत राहुल गांधी आणि अशोकरावांचीही त्यांनी खिल्ली उडविली. लोहा येथील सभेत ते म्हणाले, मी काही पंतप्रधानांच्या घरात जन्मलो नाही किंवा मुख्यमंत्र्यांचाही मुलगा नाही. पण तुम्ही नांदेडच्या मंडळींनी लोकसभेत चूक केली होती, आता भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करून ती चूक सव्याज दुरुस्त करा, असे आवाहन त्यांनी केले. पंढरपुरात बोलताना ‘यांच्या घडाळ्यातील वेळ १० वाजून १० मिनिटे असून याचा अर्थ १० वर्षांत १० पट भ्रष्टाचार असा, तर मुळातच एन.सी.पी.चा जन्म हा भ्रष्टाचारातून झालेला आहे,’, असा हल्ला मोदी यांनी राष्ट्रवादीवर चढवला.