20 September 2020

News Flash

जल्लोषाचे चौकार आणि आनंदाचे षटकार!

हजारो कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि टाळ्यांच्या कडकडाटात राज्यातील भाजपाचे पहिलेच मुख्यमंत्री ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे मैदानात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडून पदाची शपथ घेतली.

| November 1, 2014 02:52 am

हजारो कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि टाळ्यांच्या कडकडाटात राज्यातील भाजपाचे पहिलेच मुख्यमंत्री ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे मैदानात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडून पदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आदी ९ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तसेच भाजपा आणि मित्रपक्षांचे मुख्यमंत्री यांच्यासह देशातील अनेक राजकीय नेते व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला.
सोहळ्याच्या सुरुवातीलाच फडणवीस यांचे नाव पुकारले गेले आणि जल्लोष व टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. फडणवीस यांनी मराठीतून ईश्वरास साक्ष ठेवून शपथ घेतली. राज्यात भाजपाचे स्वबळावरील पहिलेच सरकार असल्याने शपथविधीसाठी जमलेल्या ३०- ३५ हजार कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. फडणवीस यांच्यानंतर भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव पुकारले गेले. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील यांना शपथ देण्यात आली. त्यांच्यानंतर पंकजा मुंडे,  विष्णू सावरा यांनाही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ दिली गेली. तर दिलीप कांबळे, विद्या ठाकूर यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

व्हीआयपींना धक्काबुक्कीचा प्रसाद
शपथविधीसाठी व्हीआयपींना निमंत्रित करण्यात आले, मात्र प्रचंड गर्दीमुळे अनेक व्हीआयपींना धक्काबुक्की झाली. मोठय़ा गर्दीत रेटारेटी झाल्याने द्वार क्र. ३ वर पोलिसांनी काठय़ांनी ढकलल्याने खासदार, माजी मंत्री, आमदार व वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनाही धक्काबुक्कीचा प्रसाद मिळाला. निम्म्याहून अधिक मैदान दुपारी तीनपूर्वीच भरले होते व अनेक दारे बंद करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. द्वार क्र. ४ बंद केल्याने व्हीआयपींचा लोंढा द्वार क्र. ३ वर दुपारी साडेतीनच्या सुमारास आला. तेव्हा पोलिसांनी काठय़ा आडव्या करून त्यांना रस्त्यावरच रोखले. पोलिसांनी गेट आतून लावून घेतले व त्यामुळे प्रचंड गर्दीत धक्काबुक्की झाली. खासदार पूनम महाजन, संजय पाटील, हीना गावीत, माजी मंत्री व आमदार विजयकुमार गावीत, गिरीश महाजन यांच्यासह यूपीएस मदान, मेधा गाडगीळ, मालिनी शंकर व अनेक आयएएस अधिकारी तेथे तिष्ठत उभे होते.
गर्दीच्या रेटारेटीचा प्रसाद सर्वानाच मिळाला. पूनम महाजन, गिरीश महाजन यांनी संबंधितांशी संपर्क साधल्यावर दरवाजे उघडण्यात आले व लोंढा आत शिरला. त्यावेळीही मोठी चेंगराचेंगरी झाली व पास तपासण्यासही कोणाला अवधी मिळाला नाही. रेटारेटीत अनेक जण मिळेल त्या ठिकाणी घुसले. पोलिसांना नीट सूचना नव्हत्या. मैदानात अनेक खुच्र्या रिकाम्या असतानाही दरवाजे बंद करण्याचे आदेश कोणत्या अधिकाऱ्यांनी दिले, व्हीआयपींना आत सोडण्यासाठी योग्य व्यवस्था का करण्यात आली नाही, हे प्रश्न यातून निर्माण झाले आहेत.

अमित शहांची उद्धव ठाकरे यांना विनंती
शिवसेनेचा सन्मान राखला जात नसल्याने शपथविधीवर बहिष्कार टाकण्याचे शिवसेनेने ठरविल्याने भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून समारंभास उपस्थित राहण्याची विनंती केली. भाजपाला शिवसेनेबरोबरच सरकार बनवायचे आहे, असेही त्यांनी ठाकरे यांना सांगितल्याचे समजते. गेली २५ वर्षे शिवसेनेशी युती असताना ती तुटल्यावर शपथविधी समारंभावरही बहिष्कार टाकण्याइतकी कटुता येणे, राजकीय सौहार्द टिकविण्याच्या दृष्टीने योग्य ठरले नसते. त्यामुळे शहा यांनी ठाकरे यांना अखेरच्या क्षणी दूरध्वनी करून शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची विनंती केली आणि त्यानुसार उद्धव ठाकरे, दिवाकर रावते, मनोहर जोशी समारंभासाठी उपस्थित राहिले.

स्वच्छता अभियानाची ऐशीतैशी
जाहीर सभांच्या ठिकाणी सभा संपल्यानंतर कोणताही कचरा करू नये एवढेच नव्हे तर सभेची जागा स्वच्छ ठेवावी यासाठी भाषण संपताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी आवाहन करतात. मात्र, मोदी यांच्या उपस्थितीतच वानखेडे स्टेडियमवर या स्वच्छता अभियानाची ऐशीतैशी झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्ते येणार हे लक्षात घेऊन वानखेडे स्टडियमवर येणाऱ्यांसाठी पाण्याचे प्लास्टिक ग्लास व खाण्याची पाकिटे वाटण्यात आली. कार्यकर्त्यांनी पाणी पिऊन व खाणे खाऊन पाकिटे व ग्लासेस हवे तेथे टाकून दिल्यामुळे स्टेडियमचे आवार व परिसरात कचऱ्याचा ढीग जमा झाले, आणि सोहळा संपल्यानंतर सफाईचे काम सुरू झाले. मात्र, मोदींच्या उपस्थितीतच ही अस्वच्छता झाल्याने भाजप नेत्यांची तोंडे पाहण्यासारखी झाली होती.

सफाईसाठी झेंडा व उपरणे
वानखेडे स्टेडियमवर अलीकडच्या काळात क्रिकेटचे सामने न झाल्यामुळे स्टँडमधील आसने कमालीची अस्वच्छ होती. अनेक आसनांवर कबुतरांनी घाण केली होती. परिणामी शपथविधीसाठी आलेल्या निमंत्रित कार्यकर्त्यांना या खराब आसनांवर बसायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला. डोक्यावर भाजपच्या टोप्या, हाती झेंडे व गळ्यातील पक्षचिन्ह असलेल्या उपरण्याचा मग मुक्तपणे आसन स्वच्छतेसाठी वापर करण्यात आला. अनेकांनी त्यानंतरही आसन स्वच्छ होत नाही व धुळ जात नाही हे पाहून टोपी-झेंडा व उपरणे आसनावर ठेवून त्यावर बैठक मारली. स्टेडियमकडे जाणाऱ्या वाटेवरही पक्षाचे झेंडे, टोप्यांचे खच पडले होते. सोहळा संपल्यावरही गर्दी कमी झाली नव्हती.

शपथविधीसाठी देशभरातील नेत्यांची हजेरी
या दिमाखदार सोहळ्यासाठी देशभरातील सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. फडणवीस यांनी नवी दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रित केले होते. तसेच अनेकांना दूरध्वनी करून आग्रहाचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे तेलुगू देसमचे सर्वेसर्वा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू शपथविधीला आले होते. भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये गुजरातच्या आनंदीबेन पटेल, राजस्थानच्या वसुंधराराजे शिंदे, गोव्याचे मनोहर पर्रिकर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, व्यंकय्या नायडू सोहळ्यास आले होते. बिहारमधील विरोधी पक्षनेते सुशील मोदीही उपस्थित होते. राज्यातील अन्य पक्षाच्या नेत्यांपैकी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, जयंत पाटील तसेच विनायक मेटे आदी समारंभास उपस्थित होते.

आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज, नाणीजचे वादग्रस्त नरेंद्र महाराज यांच्यासह विविध धर्म व पंथाचे धर्मगुरु शपथविधीच्या व्यासपीठावर उपस्थित होते. जैन, मुस्लिम व सर्वधर्मीय धर्मगुरुंच्या उपस्थितीला आक्षेप घेण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मंजूर करणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या शपथविधीला धर्मगुरुंची उपस्थिती अनेकांना खटकली. त्यातून नेमका कोणता संदेश दिला गेला, याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषदेत विचारले असता त्यांनी आमचा अंधश्रद्धेला नव्हे तर श्रद्धेला पाठिंबा असल्याचे सांगितले.
*देवेंद्र १९९९ पासून सलग चारवेळा विधानसभेवर निवडून आले आहेत.
*भाजपमध्ये स्थानिक पातळीवर काम करत एकेक पायरी चढत ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बनले.
*राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.

क्षणचित्रे
अभिनंदनाचा वर्षांव!
शपथविदीचा सोहळा संपला, आणि स्टेडियमवर उपस्थित असलेल्या हजारो चाहत्यांनी मंचाकडे अक्षरश धाव घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अभिनंदवाचा वर्षांव सुरू झाला. फडणवीस यांच्याभोवती चाहत्यांचा गराडा पडलेला पाहून सुरक्षा अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर काळजी उमटत असताना, फडणवीस यांचा चेहरा मात्र कमालीचा खुलला होता. अभिनंदनासाठी पुढे येणारा प्रत्येक हात हातात घेऊन ते शुभेच्छांचा प्रसन्नपणे स्वीकार करत होते.

आणि मुहूर्त साधला..
संध्याकाळी चार वाजून २६ मिनिटांची वेळ मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी निश्चित करण्यात आली होती. घडय़ाळाचे काटे या वेळेजवळ सरकू लागले, तोवर गर्दी स्थिरावली होती. मंचावरील निमंत्रितही स्थानापन्न झाले होते. चार वाजून सव्वीस मिनिटे झाली, आणि मुहूर्ताचा क्षण पकडून, ‘मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस’.. असा आवाज स्टेडियमवर घुमला. टाळ्यांचा कडकडाट झाला. पक्षाचा विजयघोष झाला, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री, पत्नी आणि आप्त-चाहत्यांच्या चेहऱ्यावर धन्यतेचे भाव उमटले होते.

राष्ट्रगीताची धून
शपथविदी सोहळ्याची सारी तयारी पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि सर्व मान्यवर मंचावर आले, आणि स्टेडियमवर राष्ट्रगीताची धून घुमू लागली. जल्लोष आणि घोषणांनी दुमदुमणाऱ्या मैदानात स्तब्ध शांतता पसरली. सारी गर्दी उठून उभी राहिली, आणि शपथविधी सोहळ्याला गांभीर्याची किनार लाभली..

निमंत्रितांची मांदियाळी..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, आदी नेतेही मंचावर उपस्थित होते. शपथविदी सोहळ्यास सुरुवात होण्याआधी या सर्व नेत्यांमध्ये पक्षभेद विसरून हास्यविनोद सुरू होते. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांना प्रवेशद्वारावरच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा घातला. सन्मानपूर्वक निमंत्रण मिळाले, त्यामुळे आम्ही या सोहळ्यास उपस्थित राहिलो, असे ते म्हणाले, तेव्हा सेना-भाजपमधील तणाव निवळल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरूनच जाणवत होते.

जनसंघ नेत्यांची छायाचित्रे
मैदानात पं. दीनदयाळ उपाध्याय, लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, दिवंगत नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आदींची छायाचित्रे लावण्यात आली होती. मैदानात भाजपचे कटआऊट्स, बॅनर फारसे नव्हते. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबरच पंढरीची वारी, गडकिल्ले, विधानभवन यावर दृष्टीक्षेप टाकणारी चलतचित्रे किंवा स्लाईड शो दाखविला जात होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2014 2:52 am

Web Title: devendra fadnavis sworn in as maharashtra cm
टॅग Devendra Fadnavis
Next Stories
1 दलित संघटनांची वानखेडेवर निदर्शने
2 नव्या मुख्यमंत्र्यांकडून ‘सेवेची हमी’
3 सरकारमध्ये सहभागी होण्याचे शिवसेनेचे स्पष्ट संकेत
Just Now!
X