19 September 2020

News Flash

वानखेडेवर सुदिनम् तदेव!

‘मी, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की’.. असा आवाज वानखेडे स्टेडियमच्या मैदानात घुमला आणि खचाखच भरलेल्या चाहत्यांच्या चीत्कारांनी ते स्टेडियम प्रथमच जणू शहारून उठले.

| November 1, 2014 02:57 am

‘मी, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की’.. असा आवाज वानखेडे स्टेडियमच्या मैदानात घुमला आणि खचाखच भरलेल्या चाहत्यांच्या चीत्कारांनी ते स्टेडियम प्रथमच जणू शहारून उठले. क्रिकेटच्या चौकार, षटकारांच्या आतषबाजीनंतर आणि कुणा खेळाडूची दांडी उडाल्यानंतर घुमणाऱ्या क्रिकेटवेडय़ांच्या टाळ्या, शिट्टय़ा आणि घोषणांची सवय असलेले ते स्टेडियम आज प्रथमच एका वेगळ्याच अनुभवाने पुरते मोहरून गेले होते. मैदानाच्या चहूबाजूंवरील स्टँडवर खचाखच गर्दीचा अलोट उत्साह दुपारच्या उन्हातही ओसंडून वाहत होता. क्रिकेटच्या सामन्यासाठी गोळा झालेल्या प्रेक्षकांच्या गर्दीशी मात्र या वेळी त्या उत्साहाचे अजिबातच साम्य नव्हते. या गर्दीतून भाजपच्या विजयाच्या घोषणा उमटत होत्या, भारतमातेचा जयघोष दुमदुमत होता आणि कमळाचे चिन्ह असलेले झेंडे फडकत होते. सारा परिसर भाजपमय होऊन भारावला होता..
चार वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले आणि अवघी गर्दी जणू बेभान झाली. मोदीनामाचा नेहमीचा गजर सुरू झाला आणि स्टेडियमचा कोपरान्कोपरा मोहरून गेला. महाराष्ट्रात सत्ता मिळवून देणाऱ्या विजयाचे वाटेकरी झाल्याच्या धन्यतेची सारी चिन्हे लहानथोर कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडताना स्पष्ट दिसत होती.
अशा भारावलेल्या वातावरणातच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली, तेव्हा तर अवघ्या गर्दीतून जणू धन्यतेच्या भावना उसळू लागल्या होत्या. फडणवीस यांचा शपथविधी पूर्ण होईपर्यंत स्टेडियमच्या प्रत्येक कोपऱ्यातून भाजपचा विजयघोष अखंड सुरू होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांचे नाव शपथविधीसाठी पुकारले गेले आणि पुन्हा गर्दीची एक बाजू जल्लोष करू लागली. सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांतदादा पाटील, विष्णू सावरा आदींचे शपथविधी सुरू असताना गर्दीतील त्यांचे समर्थक उत्स्फूर्त घोषणा देत होते. अशा गर्दीतच, सावरा यांचा एक वृद्ध समर्थक एकटाच उभा राहिला आणि आजूबाजूच्या घोषणाबाजीची पर्वा न करता खडय़ा आवाजात, ‘सावरासाहेब, आगे बढो’.. अशी घोषणा देऊ लागला. भाजपची निशाणी असलेली भगवी टोपी डोक्यावर चढविलेल्या त्या एकांडय़ा शिलेदारास घोषणा देताना पाहून, त्याच्या आसपासची गर्दी काही क्षण स्तब्ध झाली आणि काही आवाज आपोआपच त्याच्या सुरात मिसळून गेले. ‘हम तुम्हारे साथ है’.. म्हणणारा सामूहिक आवाज सावरा यांच्यासाठीही मैदानात घुमला..
पंकजा गोपीनाथ मुंडे यांचे नाव मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी पुकारले गेले आणि मैदानाच्या बाळासाहेब ठाकरे प्रेस गॅलरीच्या उजवीकडील स्टँडवरील जल्लोषाने वरचा सूर गाठला. ‘गोपीनाथ मुंडे अमर रहे’ अशा घोषणा अखंडपणे सुरू झाल्या आणि टाळ्यांच्या गजरातच पंकजा मुंडे यांनी शपथ पूर्ण केली. दोन राज्यमंत्र्यांसह दहा जणांचा शपथविधी सोहळा पूर्ण झाल्याचे जाहीर झाले, तेव्हा मैदानावरील गर्दीला थोडी उसंत मिळाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2014 2:57 am

Web Title: devendra fadnavis sworn in as maharashtra cm modi uddhav attend ceremony
टॅग Devendra Fadnavis
Next Stories
1 याचि देही अनुभवला, ऐतिहासिक सोहळा!
2 जल्लोषाचे चौकार आणि आनंदाचे षटकार!
3 दलित संघटनांची वानखेडेवर निदर्शने
Just Now!
X