निम्म्या जागांच्या मागणीवर भाजप ठाम असून शिवसेनेने ती साफ धुडकावली आहे. शिवसेना १६९ आणि भाजप ११७ याच जुन्या सूत्रानुसारच जागावाटप राहील. आता जागा वाढवण्याविषयी चर्चाच करायची नाही, अशी भूमिका आता शिवसेनेने घेतली असून केवळ किरकोळ जागांच्या अदलाबदलाची चर्चा होऊ शकते, असे सेना नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत आले असतानाही त्यांची भेट घेण्याचा प्रस्ताव न देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. आता शहा यांच्या प्रदेश नेत्यांबरोबरच्या बैठकीनंतरच युतीचे भवितव्य ठरेल.
शिवसेना-भाजप युती तुटली, तर चारही घटकपक्षांना आपल्याबरोबर ठेवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु असून त्यांना काही आमिषेही दाखविली जात आहेत. तर दोन दिवसांत जागावाटपाचा वाद सोडवावा, नाहीतर आम्ही महायुतीतून बाहेर पडू, असा इशारा घटकपक्षाच्या काही नेत्यांनी युतीला दिला आहे. सेनेने स्वबळावर लढण्यासाठी जय्यत तयारी सुरु ठेवली असून काही नेत्यांबरोबर ठाकरे यांनी चर्चा केली. राज्य पदाधिकाऱ्यांची बैठक दोन दिवसांत होईल.
दरम्यान अमित शहा यांनी बुधवारी रात्री उशीरा मुंबईत भाजप नेत्यांशी चर्चा केली. युती ठेवायची की नाही, याविषयी बैठकीत नेत्यांची मते अजमावण्यात आल्याचे समजते. मात्र याबाबत अधिकृत तपशील मिळू शकला नाही. या बैठकीला राजीव प्रताप रूडी आणि ओम माथूर यांच्यासह भाजपचे राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदार-खासदारांची बैठक आज, गुरुवारी दुपारी १२ वाजता मातोश्री येथे बोलावली आहे. तसेच येत्या रविवारी, २१ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
घटकपक्षांशी चर्चा
घटकपक्षाच्या नेत्यांनी भाजप-शिवसेना नेत्यांशी बुधवारी चर्चा केल्या. भाजप नेत्यांनी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रामदास आठवले, महादेव जानकर यांच्याशी चर्चा केली. तर शेट्टी हे ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानीही गेले व त्यांच्याशी चर्चा केली. युतीतील वाद दोन दिवसांत संपवून जागावाटप व्हावे, अन्यथा आम्हाला स्वतंत्रपणे लढावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा घटकपक्षाच्या नेत्यांनी युतीला दिला आहे. युती तुटल्यास हे घटकपक्ष कोणासोबत राहतील, याची चाचपणीही भाजप-शिवसेनेने केली आहे. युती तुटल्यास घटकपक्षांचा अधिक लाभ होणार असून त्यांच्या वाटय़ाला जास्त जागा येतील, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचबरोबर सत्ता आल्यावर चांगला वाटा देण्याचे आमिषही दाखविले जात आहे.