भाजपने शिवसेनेची मंत्रीपदे व खात्यांची मागणी धुडकावल्याने शिवसेनेने पुन्हा हिंदूुत्वाचा गजर करीत भाजपपुढे खोडा घातला आहे. पण केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्यास नकार देऊन शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचा अवमान केल्याने आणि ताठर भूमिका कायम ठेवल्याने भाजप आता शिवसेनेला अजिबात किंमत देणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेनेच आता सत्तेतील सहभागाचे दरवाजे बंद केले असून भाजपकडून चर्चेसाठी पुढाकार न घेण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सभागृहात अनुपस्थित राहून भाजपला मदत करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याने विश्वासदर्शक ठराव निश्चितपणे मंजूर होईल, अशी खात्री भाजपला वाटत आहे.
शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचा उल्लेख करुन टीका झाली. मोदी व भाजपवर शिवसेनेने जाहीर टीका केली. त्यामुळे शिवसेनेला खेळवत अद्दल घडविण्याची रणनीती भाजपने आखली आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठी झुलवत ठेवायचे आणि ठरावासाठी पाठिंबा घेऊन नंतर सत्तेतही पुरेसा वाटा द्यायचा नाही व विरोधी पक्षनेतेपदही मिळू द्यायचे नाही, अशी राजकीय खेळी आहे. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाआधीच सत्तेत महत्वाची खाती आणि मंत्रीपदे यांची मागणी मान्य करुन शपथविधीही पार पाडण्याचा आग्रह शिवसेनेने धरला आहे. शिवसेनेला सात कॅबिनेट व सात राज्यमंत्रीपदे हवी आहेत. उपमुख्यमंत्रीपद न ठेवण्याच्या भूमिकेवर भाजप ठाम असल्याने त्याबदल्यात गृह खाते किंवा विधानसभा अध्यक्षपद मिळावे, अशी शिवसेनेची मागणी आहे. काही दुय्यम खाती देऊन शिवसेनेची बोळवण करण्याचा भाजपचा विचार असल्याने शिवसेनाही आता हट्टाला पेटली आहे. त्यामुळे जागावाटपाचे खरे कारण असले तरी हिंदूुत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचा तात्विक मुद्दा उपस्थित करुन शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याची तयारी असल्याचे प्रतिपादन केले आहे.
हिंदुत्वाच्या विचाराने २५ वर्षे भाजपबरोबर युती टिकविलेल्या शिवसेनेने त्याच मुद्दय़ावर भाजपपासून फारकत घेण्याचे ठरविले आहे. मंत्रीपदांच्या मागणीसाठी शिवसेना सत्तेत सहभागी झाली नाही, असे चित्र निर्माण होण्यापेक्षा आणि भाजपबरोबर फरपट करून घेण्यापेक्षा िंहदुत्वाच्या मुद्दय़ावर भाजपशी जुळणारे नातेसंबंध तोडले, तर त्याचा पक्षाला फायदा होईल, असे शिवसेना नेतृत्वाला वाटत आहे. त्यामुळे सध्या तरी शिवसेना-भाजपमध्ये तडजोडीची  शक्यता फारच कमी असून दोन्ही पक्ष आक्रमक भूमिकेत आहेत. मुद्दय़ांपेक्षा मने दुभंगली असल्याने ती जोडली जाण्याची चिन्हे नाहीत, असे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.