06 July 2020

News Flash

जबाबदारीचे भान ठेवून बोला!

आपल्या हातात सत्ता दिल्यास राज्यात केवळ मराठी मुलांनाच नोकऱ्या देऊ, परप्रांतीयांना एकही नोकरी देणार नाही, एवढेच नव्हे तर त्यांना राज्यात येऊ देणार नाही,

| October 21, 2014 02:50 am

आपल्या हातात सत्ता दिल्यास राज्यात केवळ मराठी मुलांनाच नोकऱ्या देऊ, परप्रांतीयांना एकही नोकरी देणार नाही, एवढेच नव्हे तर त्यांना राज्यात येऊ देणार नाही, असे प्रक्षोभक आणि वादग्रस्त वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठेवला आहे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी बोलताना समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये करू नयेत, अशी तंबीही आयोगाने ठाकरे यांना दिली.  
निवडणूक प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी ५ ऑक्टोबर रोजी घाटकोपर आणि ७ ऑक्टोबर रोजी कालिना येथील जाहीर सभेत परप्रांतीयांना लक्ष्य केले होते. ‘ज्या दिवशी तुम्ही हे राज्य माझ्या हातात द्याल, त्या दिवसापासून राज्यातील कोणताही रोजगार हा मराठी मुला-मुलींनाच दिला जाईल. अन्य राज्यांतील मुला-मुलींना नोकऱ्या दिल्या जाणार नाहीत. त्यांना राज्यात येण्यापासूनच रोखले जाईल. परप्रांतीयांना पोसण्याचा महाराष्ट्राने काही ठेका घेतलेला नाही. केवळ आमच्याच मुलांना नोकऱ्या मिळतील,’ अशी वक्तव्ये राज यांनी केली होती. त्यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्याने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा ठपका ठेवीत आयोगाने ठाकरे यांच्याकडून खुलासा मागिला होता. त्यात विविध कायद्यांचे दाखले देत आपण कोणताही आचारसंहिता भंग केला नसल्याचा दावा ठाकरे यांनी आयोगाकडे केला होता. मात्र ठाकरे यांचा हा दावा आयोगाने सपशेल फेटाळून लावला. आपण केलेली वक्तव्ये ही घटनेने दिलेल्या संचार स्वातंत्र्याची पायमल्ली करणारी आहेत. परप्रांतीयांना नोकऱ्या न देण्याचे वक्तव्य हे घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांवरच घाला घालणारे आणि आदर्श आचारंसहितेचाही भंग करणारे आहे. समाजात तणाव वा भेदभाव निर्माण करणारी वक्तव्ये करण्याचा कोणत्याही राजकीय पक्षाला वा उमेदवाराला अधिकार नाही, असे आयोगाने सुनावले आहे. तसेच भविष्यात अशी वक्तव्ये करताना खबरदारीने वागण्याची तंबीही दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2014 2:50 am

Web Title: ec censures raj thackeray for remarks against non maharashtrians
टॅग Raj Thackeray
Next Stories
1 भाजपकडून बहुमताची जुळवाजुळव; १२ अपक्षांचा पाठिंबा
2 कोंबडा झाकला तरी, आरवायचे थांबत नाही
3 आयाराम गयारामांच्या ‘गटांगळ्या’..
Just Now!
X